20 लाख रुपये मंजूर, कचऱयाचे होणार योग्य नियोजन
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर येथे कचरा निर्मुलन डेपोसाठी नरेगा योजनेतून 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्याचा शुभारंभ 19 ऑगस्ट रोजी करण्यात आला आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते कॉलम भरणी करुन त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
कचरा निर्मुलन ही जबाबदारी ग्राम पंचायत इतकीच ग्रामस्थांची देखील आहे. कचऱयाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळेच सरकारने या प्रकल्पासाठी 20 लाख रुपये मंजूर केले आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी सांगितले.
सुका कचरा आणि ओला कचरा याचे योग्य व्यवस्थापन केले जाणार आहे. सध्या एकच वाहन दिलेले आहेत. त्यामुळे आणखी एक वाहन उपलब्ध करावे यासाठी मागणी केली जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरातून कचऱयाची उचल केली जाणार आहे. सुंदर व स्वच्छ गाव बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, दयानंद उघाडे, शिवाजी नांदुरकर, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, राजू डोण्य़ाण्णावर, शांता काकतकर, ग्राम पंचायत सेपेटरी सदानंद मराठे, क्लर्क उदय हुंदरे, कलमेश कोलकार, संगणक ऑपरेटर निर्मला, कंत्राटदार शिवाजी भातकांडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









