प्रतिनिधी /बेळगाव
केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिगं ऍण्ड टेक्नॉलॉजी, हुबळी येथील केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे कृषी व फळ प्रक्रिया उद्योगांवर आधारलेले 75 प्रकल्प सादर करण्यात आले. फळ प्रक्रिया, घरगुती उपकरणे, वैद्यकीय उपकरणे या सर्वांचा यामध्ये समावेश होता. प्रथम वर्षात शिकणाऱया 300 विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला होता. या प्रकल्पांचे ‘प्रयोगवर्ष 2022’ या प्रदर्शनाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नितेश पाटील म्हणाले, अभियांत्रिकी व्यवसायातील बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी संशोधन केले जात आहे. नवनवीन
तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्याचा पयत्न केला जात आहे. भारत हा वेगवान विकसित होणारा देश असून, देशाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
हुबळी येथील केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अशोक शेट्टर म्हणाले, आज नवीन शिकण्याचे तंत्र म्हणजे केवळ पाच तास वर्गात उपस्थित राहणे नाही तर प्रकल्प आधारीत शिक्षणाद्वारे कौशल्य आत्मसात करणे असा असल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. बसवराज कटगेरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ऐश्वर्या कळसद, प्रा. सदानंद कुलकर्णी उपस्थित होते.









