वार्ताहर /उचगाव
देशाची भावी पिढी ही युवावर्ग आहे. या युवकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यावर योग्यप्रकारे संस्कार, मार्गदर्शन केले आणि युवकांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन नियमित व्यायाम, चांगला आहार, चांगले शिक्षण घेतल्यास आणि निर्व्यसनी राहून पुढे वाटचाल केल्यास त्यांचे पुढील आयुष्य आणि भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन बेळगाव जिह्याच्या खासदार मंगला अंगडी यांनी व्यक्त केले. अतिवाड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने जवळपास 15 लाख ऊपये खर्च करून उभारलेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. या व्यायामशाळेचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा खासदार मंगला अंगडी तसेच राज्यसभा सदस्य ईराणा कडाडी, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव, बेकिनकेरे ग्रा. पं.अध्यक्षा छबुबाई कांबळे, मुंबईहून खास अतिथी म्हणून उपस्थित असलेले उद्योजक योगेश हेळकर, मुंबईतील शिवसेनेचे शाखा क्रमांक 143 शाखा प्रमुख सचिन नाचणकर, लखन गुऊजी, सतीश निलजकर, प्रदीप पाटील, नगरसेवक राजू भातखांडे, नगरसेवक शंकर पाटील, रामलिंग पाटील, दयानंद भोगण, अजित जाधव, नागनाथ जाधव, आनंद पाटील, ग्रामपंचायत पीडीओ स्मिता चंदरगी उपस्थित होत्या.
यावेळी ईराणा कडाडी म्हणाले, आम्ही जनप्रतिनिधी आहोत. लोकांच्या इच्छेनुसार विकासाची कामे व्हावीत म्हणून आम्ही शासनाचा निधी देत असतो. अतिवाड गावात धनंजय जाधव व यतेश हेब्बाळकर यांनी प्रामाणिकपणे काम करून भव्य अशी ही व्यायामशाळा उभारली असून युवा पिढीला व्यायामाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी धन्यवाद मानून त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, अतिवाड गावामध्ये यतेश हेब्बाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यायामशाळेच्या निर्मितीसाठी अतिशय कष्ट घेतले आहेत. आपला वेळ देऊन ही व्यायामशाळा त्यांनी उभी केली आहे. येथील तऊणांनी या व्यायामशाळेचा पुरेपूर उपयोग करून आपले आरोग्य सांभाळावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. ही व्यायामशाळा उभी करण्यासाठी आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यतेश हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व या विभागातील कार्यकर्त्यांनी बरेच परिश्र्रम घेऊन ही अद्ययावत अशी व्यायामशाळा या भागातील युवकांना उपलब्ध करून दिली आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.









