कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून वृक्षप्रसाद योजना होणार सुरु
सातारा प्रतिनिधी
“आकाशाला गवसनी घालायचे असेल तर पक्षासारखे जगता आले पाहिजे, झाडासारखं जगाकडे मायेने बघता आले पाहिजे. प्रॉपर्टी नावावर असते. जमीन नावावर असते म्हणजे काय कागदावर नाव असते. आपण ठरवल पाहिजे. धुळ खात पडून रहायचे कागदाच्या पानावर की सावली देणारे झाड व्हायचे गावच्या माळ रानावर” अशा कवि अरविंद जगताप यांच्या कवितेतील ओळीतून झाडांचे महत्व सांगत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता बटरफ्लाय गार्डनचे उद्घाटन उद्योजक फारोख कूपर यांच्या हस्ते करतो आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सह्याद्री देवराई प्रकल्प येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, साताऱ्यात आगळेवेगळी सह्याद्री देवराई प्रकल्प होत आहे. सगळे मित्र, संघटना या देवराई प्रकल्पाचे सदस्य व्हावेत. प्रत्येकाने आपला सहभाग द्यावा. तो श्रमदानातून असेल वा इतर सहकार्यातून असेल. आम्ही तिघे चौघे करतो म्हणून हा आमचा प्रकल्प नाही. तुमचा सर्वांचा आहे. शासनाच्या जागेत आहे. शासनाचा सहभाग आहे. वृक्षप्रेमींचा सहभाग असतो. कोणी झाडे देत असेल तर उत्तमच. कोणी श्रमदान करत असेल तर फार उत्तम. दि. 8 रोजी येथे उद्योजक फारोख कूपर यांच्या हस्ते बटरफ्लाय गार्डनचे उद्घाटन होतेय आणि त्यानिमित्ताने येथे काय काय चालते तेही येथे दाखवतो. वेगवेगळया प्रकारचे झाडे आहेत. जंगल व्हावे या दृष्टीने हे सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
वृक्ष प्रसाद योजना प्रभावीपणे राबवावी
कोल्हापूरला निघालो आहे. तेथील महालक्ष्मीच्या पुजाऱयांना भेटून वृक्ष प्रसाद योजना कशा पद्धतीने राबवायचे हे मी बोलणार आहे. अभिषेक वा पुजा घातल्यानंतर भक्तांना पुजाऱयांनी वृक्ष म्हणून प्रसाद द्यायचा. हे झाड लावल्यावर वाढल, त्याला फळ आले की तुम्हाला देव प्रसन्न झाला असं समजायचे. सुखसमृद्धी, शांती लाभली अशी संकल्पना दगडूशेठ हलवाई मंदिरात सुरु करण्यात आली आहे. तुळजापूरला करायची, शेगावला करायची. ही लोक तयारी झालीत. पत्रक देवून त्यांना तयार केले आहे. महालक्ष्मी मंदिराला उद्यापासून सुरुवात होत आहे. सकाळी 8 वाजता अभिषेक झाले की तेथे सुरुवात होणार आहे. निसर्ग हाच खरा देव आहे. प्रतापगडाला जेवढे वर्ष झाली तेवढय़ा पणत्या लागतात. तेवढी झाडे लावली तर एवढय़ा साऱ्या मशाली हिरवी झाडं होती. गडाच्या बाजूने झाडे लागली तर हिरवी मशालपण आहे, पेटती मशाल पण आहे हे कळेल, असे त्यांनी सांगितले.
झाडाची शोकसभा व्हावी
महत्वाची गावातील व्यक्ती गेली तर शोकसभा होते. परंतु गावातील 200 वर्षाच झाड गेले तर ती होत नाही. झाडाने ऑक्सिजन दिलेले असते. फळे दिलेली असतात. पिढया जगवलेल्या असतात. त्यामुळे झाडाची शोकसभा व्हायला हवी, असाही मानस अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच दि. 9 ऑक्टोबर रोजी पुणे येथे वृक्ष संवाद आयोजित करण्यात आलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.