आमदार असिफ सेठ यांचे विशेष प्रयत्न
बेळगाव : हिंडलगा रोड येथील गांधीस्मारक ते मिलिटरी गणपती मंदिरापर्यंतच्या रस्ताकामाचा शुभारंभ रविवारी केला. बेळगाव उत्तरचे आमदार असिफ ऊर्फ राजू सेठ यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. 900 मीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरण केले जाणार आहे. यामुळे मागील अनेक दिवसांपासून खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील गांधीस्मारक ते गणपती मंदिरापर्यंतचा रस्ता पूर्णत: खराब झाला होता. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे धोक्याचे ठरत होते. त्यामुळे अनेक अपघात घडले होते. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी मागील वर्षभरापासून सुरू होती. यासाठी अनेक वेळा आंदोलनेही केली. तात्पुरत्या स्वरुपात खड्ड्यांची डागडुजी केली होती. परंतु, रस्ता केव्हा होणार, याची चिंता वाहनचालकांना होती.
पाच-सहा दिवसात डांबरीकरण पूर्ण
आमदार राजू सेठ यांनी विशेष निधीतून रस्त्याचे काम मंजूर करून आणले आहे. एकूण 85 लाख रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. 900 मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यामुळे आता बेळगाव-हिंडलगा प्रवास करणे सोयीचे होईल. येत्या पाच ते सहा दिवसात डांबरीकरणाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास आमदार सेठ यांनी व्यक्त केला.









