मडगाव : इलेक्ट्रिक दुचाकी निर्मित अग्रेसर असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्स कंपनीचा ‘अँपिअर’ शोरूम लयामती-दवर्ली येथे सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत उपस्थित होते. अँपिअर शोरूमचे सत्यजीत प्रभुदेसाई, पंकज नाईक गांवकर व आनंद प्रभुदेसाई यावेळी उपस्थित होते. या शोरूमचे उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आत्ता सर्वांनी इलेक्ट्रिक दुचाकीवर भर देण्याची वेळ आली आहे. इंधनाचा वापर केल्याने प्रदूषणात वाढ होत असल्याने सर्वांनी आपली जबाबदारी ओळखणे महत्वाचे बनले आहे. आजच्या युवा पिढीने स्वताचा व्यवसाय सुरू करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारच्या अनेक योजना असून स्टार्टअप मार्फत पुढे जाण्याची संधी उलपब्ध होत आहे.
अँपिअर शोरूम सुरू करून दक्षिण गोव्यातील लोकांना इलेक्ट्रिकल दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्यजीत प्रभुदेसाई, पंकज नाईक गांवकर व आनंद प्रभुदेसाई यांचे अभिनंदन केले. युवकांनी स्वयंरोजगारात पुढे यावे साठी बँकाकडून सुलभ कर्ज उपलब्ध करण्याची सोय करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी ही अँपिअर शोरूमला आपल्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, दवर्लीचे जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, दवर्लीचे सरपंच तसेच पंच सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी आधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत. भारतीय रस्ते आणि वापर-परिस्थितीनुसार अनुकूल असतील. इलेक्ट्रिक वाहने आधुनिक तसेच सुरक्षित असतील, असा दावा कंपनीने केला आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या नवीन श्रेणीमध्ये नवीन डिझाइन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. जाईल. मेक-इन-इंडिया मोहिमेअंतर्गत स्थानिक उत्पादकांकडून कंपनी उपकरणे खरेदी करते. कंपनीच्या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी आणि इतर पार्टसही भारतातच तयार होतात.









