आंबोली महोत्सवाची ख्याती जगभर पसरेल – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
आंबोली/ वार्ताहर
आंबोलीत पर्यटन वाढीसाठी आंबोली बाजारवाडी ते मुख्य धबधब्यापर्यत पर्यटकांना जाण्या- येण्यासाठी तसेच जंगल सफारीसाठी इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याच्या सुचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केल्याने ह्या पर्यटन महोत्सवाचे खऱ्या अर्थाने फलीत झाले आहे. तसेच ह्या पर्यटन महोत्सवाची ख्याती जगभरात पसरविली जाईल अशी घोषणाही त्यांनी या पर्यटन महोत्सवात केली. ते पुढे म्हणाले पर्यटन विकास साधायचा असेल तर राजकारणाची पादत्राणे बाहेर ठेऊन काम केल्यास या जिल्ह्याचा विकास नक्कीच होईल असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केले. ते आंबोली पर्यटन महोत्सव २०२३ मध्ये बोलत होते.
ते पुढे म्हणाले सर्वत्र हॉटेल बांधून पर्यटन विकास होत नसतो. आंबोलीला जैवविविधतची नैसर्गिकता लाभली आहे. आंबोलीत ठिकाणी चारच महिने पाऊस पडतो तर चेरापुंजीत नऊ महीने पाऊस पडतो. देशात एअर फ्लो म्हणजे पावसाचे पाणी परत येणे अशी मोजकीच ठिकाणे आहेत. त्यामुळे कावळेसाद येथे हँग ग्लायडींग होणे शक्य आहे. हा प्रकल्प येथे होणे असल्याचे ते म्हणाले. तसेच ऍडव्हेन्चर स्पोर्स्टसाठी कावळेसाद पॉंईट महत्वाचा आहे. तसेच या ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी आंबोली ,चौकुळ , गेळे, पारपोली ही गावे एकत्रित होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील पंचक्रोशीचा विकास होऊ शकेल. होस्ट प्लॅन आवश्यक आहे.









