पर्तगाळ मठाधीशांच्या उपस्थितीत उद्घाटन व पालखी सोहळा
प्रतिनिधी /फोंडा
रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन पर्तगाळ जीवोत्तम मठाचे पिठाधीश विद्याधिश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींच्याहस्ते झाले. सोमवारी सायंकाळी देवस्थानचे महाजन, भजक, कुळावी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
नामफलकाचे अनावरण व दीपप्रज्वलीत करून स्वामीजींच्याहस्ते नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मंदिराच्या सभामंडपात स्वामीजींचे आशीर्वचन व त्यानंतर पालखी सोहळा झाला. तत्पूर्वी स्वामीजींची पाद्यपूजा करण्यात आली. सन् 2004मध्ये माघ महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेच्या मुहूर्तावर या वास्तूचे पूर्व स्वामीजींच्याहस्ते उद्घाटन झाले होते व 19 वर्षांनंतर त्याच मुहूर्तावर नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचे विद्यमान स्वामीजींच्याहस्ते उद्घाटन होत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. आपल्या आशीर्वचनपर भाषणात स्वामीजींनी मंत्र पठणाचे महत्त्व सांगितले. परमेश्वरावर विश्वास ठेवून मंत्रपठण केल्यास अपेक्षित फलप्राप्ती होते. त्याचप्रमाणे दृढ विश्वासाने तीर्थस्नान केल्यास पापक्षालन होते. कुठल्याही कृतीमागे पवित्र भावना व अढळ विश्वास हवा. तेव्हाच त्याची फलश्रुती होत असते, असे स्वामीजी म्हणाले. रामनाथ देवस्थानच्या पुढील महाशिवरात्री उत्सवाला उपस्थित राहण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. तसेच देवस्थानच्या निवासी वास्तूच्या पुर्ननिर्माणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रशासकीय कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी काम केलेले आर्किटेक्ट रोहन तिंबले, अतुल विर्जिनकर, संतोष गुरव, शदाब शेख, अनंतराज पै खोत, अभिष शर्मा, अमिर कवळे, निलेश जुवारकर यांचा यावेळी स्वामीजींच्याहस्ते सन्मान करण्यात आला.









