संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून बीआरओची प्रशंसा
वृत्तसंस्था/ जम्मू
कुठल्याही प्रकल्पाला मुदतीत पूर्ण करणे हे केवळ सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) प्रतिबद्धतेमुळे शक्य झाल्याचे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी काढले आहेत. संरक्षणमंत्र्यांनी सीमा रस्ते संघटनेकडून निर्मित 90 पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन करत ते देशाला समर्पित केले आहेत. एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करणे आणि तो वेळेत पूर्ण करणे नव्या भारतासाठी सामान्य बाब आहे. बीआरओने रस्त्यांच्या मदतीने केवळ जागांना नव्हे तर लोकांच्या मनानांही जोडावे असे राजनाथ म्हणाले.
एक संस्था म्हणून बीआरओला सीमावर्ती भागांमध्ये सुरू असलेल्या कुठल्याही प्रकलपात स्थानिक संस्था अन् लोकांसोबत सातत्याने काम करावे लागेल. स्थानिकांच्या गरजा समजून घेत त्यांच्याकडून इनपूट मिळवा. यामुळे स्थानिकांमधील आत्मविश्वास वाढून प्रकल्पाचे काम सोपे होणार असल्याचे वक्तव्य राजनाथ यांनी केले आहे.
आम्ही किमान गुंतवणूक, कमाल मूल्याच्या मंत्रासोबत काम केले आहे, आता आम्हाला किमान पर्यावरणीय हानी, कमाल राष्ट्रीय सुरक्षा आणि कमाल कल्याणाच्या मंत्रासोबत वाटचाल करावी लागणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
राजनाथ सिंह यांनी देवक ब्रिजवर आयोजित एका सोहण्dयात बीआरओकडून 2941 कोटी रुपयांच्या निधीतून निर्मित 90 पायाभूत प्रकल्पांना देशाला समर्पित केले आहेत. या प्रकल्पांची निर्मिती 10 सीमावर्ती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आली आहे. 22 रस्ते, 63 पूल, अरुणाचल प्रदेशातील नेचिफू भुयारीमार्ग, पश्चिम बंगालमधील दोन हवाईक्षेत्रांचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.
बीआरओने या महत्त्वपूर्ण सामरिक प्रकल्पांची निर्मिती विक्रमी कालावधीत केली आहे. या प्रकल्पातील 11 जम्मू-काश्मीरमध्ये, 3 हिमाचल प्रदेशात, प्रत्येकी 2 प्रकल्प सिक्कीम, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये तर नागालँड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी आम्हा सर्वांना मिळून काम करावे लागणार आहे. या कामात आम्हाला सर्वांचे सहकार्य मिळत आहे. याचे उदाहरण या प्रकल्पांमध्येही दिसून येते. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे पक्ष सत्तेवर आहेत, परंतु सीमावर्ती क्षेत्रांमध्ये पायाभूत विकासात आम्ही सर्वजण परस्परांचे समर्थन करत आहोत. राज्य सरकारांच्या या सहकार्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.









