राज्य ग्राहक आयोगाच्या निबंधकांची बेळगावला भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य ग्राहक आयोग पीठ बेळगावला यापूर्वीच मंजूर झाले आहे. त्यामुळे पिठाच्या उद्घाटनासंदर्भात चर्चा करण्यासाठी कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे निबंधक मल्लिकार्जुन ईश्वरप्पा कमतगी शुक्रवारी बेळगावला आले होते. त्यांनी बेळगाव बार असोसिएशन आणि जिल्हा ग्राहक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
बेळगावला राज्य ग्राहक आयोग पीठ नव्हते. त्यामुळे येथील खटल्यांसाठी वकील व अशिलांना वारंवार बेंगळूरला जावे लागत होते. यासाठी आर्थिक खर्च सोसावा लागत होता. त्यामुळे बेळगावात राज्य ग्राहक आयोग पीठ सुरू करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यामुळे गेल्या महिनाभरापूर्वी बेळगावला राज्य ग्राहक आयोग पीठ सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. ऑटोनगर येथे जागाही निश्चित करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात पिठाचे कामकाज सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे तातडीने पिठाचे लोकार्पण करून कामकाज सुरू करण्यात यावे, अशी मागणी बेळगाव येथील विविध वकील, त्याचबरोबर इतर संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य ग्राहक आयोगाचे निबंधक मल्लिकार्जुन ईश्वरप्पा कमतगी हे शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांनी पिठाच्या उद्घाटन कार्यक्रमासंदर्भात बेळगाव बार असोसिएशन आणि जिल्हा ग्राहक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, उपाध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी, अॅड. विजयकुमार पाटील, चिटणीस अॅड. वाय. के. दिवटे, सदस्य अॅड. सरेश नागनुगी यांच्यासह पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते.









