जगदगुरू शंकराचार्य व मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

वास्को : सांकवाळ पठारावरील भव्य राधाकृष्ण मंदिराचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी प्राण प्रतिष्ठापना विधी जगदगुरू शंकराचार्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बिर्ला कुटुंबाच्या या खासगी सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही उपस्थिती लावली. मंत्री माविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, सांकवाळचे उपसरपंच गिरीष पिल्ले व इतर मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सुंदर राधाकृष्ण मंदिराचे उद्घाटन प.पू. ज्योतीष पीठाधिश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामीजी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांच्या हस्ते करण्यात आले. उद्योगपती बिर्ला कुटुंबाच्या ‘राधा-कृष्ण’ मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळ्याचा भाग होणे हा आपल्यासाठी खरोखरच सन्मानाचा विषय असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. विशाल व सुंदर राधाकृष्ण मंदिर राज्याचे आकर्षण ठरणार आहे. या सुंदर मंदिरात देशभरातील भाविक विशेषत: पर्यटक भेटी देतील ज्यामुळे राज्याच्या पर्यटनालाही चालना मिळेल असे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. गोव्यात अशा प्रकारच्या सुंदर मंदिराची उभारणी केल्याबद्दल बिर्ला कुटुंबाचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शंकराचार्यांचे आशिर्वाद घेतले.









