वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मुख्य सचिवांची अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना : आवश्यक बाबींसाठी त्वरित प्रस्ताव पाठवा
बेळगाव : जिल्हा ऊग्णालय आवारात उभारण्यात आलेल्या नूतन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे तातडीने लोकार्पण करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक साहित्य आणि इतर अन्य बाबी मंजुरीसाठी सरकारला पाठविण्यात याव्यात, त्याला तात्काळ मंजुरी दिली जाईल, असे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मुख्य सचिव मोहम्मद मोसिन यांनी बिम्सच्या अधिकाऱ्यांना सांगितले. गुऊवार दि. 12 रोजी त्यांनी बिम्समध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची सद्यस्थिती जाणून घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत उभारून जवळपास वर्षाचा कालावधी उलटला आहे. इमारतीचे सर्व काम पूर्ण झाले असून काही वैद्यकीय उपकरणेही त्याठिकाणी बसविण्यात आली आहेत.
पण, मनुष्यबळाला मंजुरी मिळाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. तज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचे मुख्य सचिव मोहम्मद मोसिन यांना सांगण्यात आले. जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे आवश्यक बाबींसाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा, त्याला तातडीने मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. बिम्सच्या प्रशासकीय कार्यालयात बैठक घेण्यासह त्यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी, वैद्यकीय संचालक डॉ. इराण्णा पल्लेद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल शिंदे व अन्य अधिकारी उपस्थित होते.









