वार्ताहर /किणये
बेळगुंदी-गणेशपूर रोड येथील कल्लेहोळ क्रॉस नजीक सागर गोडाऊनच्या पाठीमागे नव्याने बांधण्यात आलेल्या महेश्वर महादेव मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला. तीन दिवस झालेल्या कार्यक्रमांमध्ये हर हर महादेवचा गजर झाला. धार्मिक व भजनाचे कार्यक्रम झाले. परिसरातील निवृत्त सैनिक व व्यंकटेश्वर परिवाराच्यावतीने हे मंदिर बांधण्यात आले असून बेळगुंदी रोडपासून अगदी नजीक असलेले हे आकर्षक असे मंदिर आहे. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात गणेशपूजन, नवग्रहपूजन, कुटिरहोम व सायंकाळी प्रवचन व भजनाचा कार्यक्रम झाला.
दुसऱ्या दिवशी अग्नीस्थापना, होम पूजन, स्थापित देवतांची पूजा, महान्यास, हवन, ध्यानाधिवास आदी पूजा करण्यात आल्या. तिसऱ्या दिवशी मंदिरात सकाळी पार्थहोम, पिंडीकाधिवास आदी पूजा झाल्या. त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण आदी कार्यक्रम झाले. हे धार्मिक कार्यक्रम आचार्य महामंडलेश्वर स्वामी, सविधानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. स्वामीजीनी आपल्या प्रवचनातून भगवान शंकराबद्दल माहिती सांगितली. या उद्घाटन सोहळ्यानिमित्त रोज भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यंकटेश्वरा को ऑप. पॉवर अँड अॅग्रोचे चेअरमन शिवाजी शामराव डोळे, संचालक यल्लाप्पा पुन्नाप्पा झंगरुचे, माजी सैनिक व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









