उच्चदाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची नागरिकांची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. कुंतीनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नवीन जलवाहिनी घालण्यात आली. मात्र उच्चदाबाने आणि मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे शहरात चोवीस तास पाणीपुरवठा कसा करणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील विविध भागात चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचे विस्तारीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र दुसरीकडे नळांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. कुंतीनगरसारख्या उपनगरात उच्चदाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्या अपुऱया पाणीपुरवठय़ामुळे रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशी स्थिती असताना चोवीस तास पाणी योजना कशी राबविणार? असा मुद्दा कुंतीनगरमधील रहिवासी उपस्थित करीत आहेत.
कुंतीनगर परिसरातील नळांना दूषित पाणी येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर दोन वर्षांनी येथील जलवाहिन्या बदलण्यात आल्या. पण जलवाहिन्यांद्वारे उच्चदाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. तसेच पाणीपुरवठा देखील कमी वेळेत करण्यात येत असल्याने रहिवाशांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे जलवाहिन्या बदलून उपयोग काय? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. एकीकडे स्मार्ट सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा केली जात आहे. तर दुसरीकडे मुबलक पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे हीच स्मार्ट सिटी आणि याच स्मार्ट सुविधा करण्यात आल्या आहेत का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.









