पावसाच्या फक्त अधूनमधून सरी, जोरदार पावसाकडे शेतकऱयांच्या नजरा : पिकांना फटका बसण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा पावसाने आपली मर्जी फिरविल्याने बळीराजा चिंतेत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून पावसाने बऱयापैकी साथ दिली होती. तर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले असून आर्द्राही कोरडे जाईल, अशी भीती आता व्यक्त होवू लागली आहे. अतिशय थोडय़ा प्रमाणात पाऊस पडून दडी मारु लागला आहे. यामुळे शेतकऱयांची पंचाईत झाली आहे. पिके वाढण्यासाठी पुरेसा पाऊस आवश्यक आहे. मात्र तोच गायब झाला असून शेतकऱयांच्या नजरा आता पावसाकडे लागून आहेत.
अवकाळी पावसाबरोबरच वळिवाने संपूर्ण जिल्हय़ाला चांगलेच झोडपले. पावसाबरोबर जोरदार आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले होते. जोरदार पाऊस आणि वाऱयाने अनेक घरांची पडझड झाली होती. या झालेल्या वळिवाने मोठे नुकसान झाले आहे. तर क्लबरोडसह इतर ठिकाणी पडलेल्या झाडांमुळे 20 ते 25 वाहनांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वळिवामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. मात्र मृगानेही ओढ दिल्याने आर्द्रा जोरदार बरसणार अशी आशा होती. मात्र आर्द्रानेही तोंड फिरविले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आर्द्रा नक्षत्रातही केवळ हलक्या सरी
मे महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात वळिवाने जोरदार हजेरी लावली. या झालेल्या वळिवामुळे काही ठिकाणी नाल्यांनाही पाणी आले आहे. उन्हाळय़ानंतर नाल्यांना लवकर पाणी येणे तसे दुरापास्तच. पण यावर्षी जिल्ह्यातील काही नाल्यांना व नद्यांना पाणी आले. मृग नक्षत्रात पाऊस आलाच नाही. परिणामी सर्वत्र पिकांना मोठय़ा पावसाची गरज आहे. मात्र आर्द्रा नक्षत्रातही केवळ हलक्मया सरी कोसळत आहेत. त्यामुळे मोठय़ा पावसाची गरज निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळपासून पाऊस बरसेल अशी आशा होती. मात्र सायंकाळच्या सुमारास पुन्हा उन दिसून आले. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
वळिवाच्या अवतारामुळे अक्षरशः जनता हैराण
मागील वर्षी वळिवामध्ये जिल्हय़ात वीज पडून फार मोठय़ा प्रमाणात प्राणहानी झाली होती. याचबरोबर घरांचीही पडझड झाली होती. यंदाच्या वळिवात विद्युत खांब, टेलिफोन खांब, कोसळून मोठे नुकसान झाले आहे. हेस्कॉम, बीएसएनएल यांचेही लाखो रुपयांची हानी झाली आहे. बऱयाच ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही झाडांच्या फांद्या पडून वाहनांचे आणि घरांचेही नुकसान झाले आहे. यावर्षी वळिवाच्या या अवतारामुळे अक्षरशः जनता हैराण झाली आहे. मात्र प्रारंभीच्या मृग व आर्द्रा नक्षत्रावर पाऊस न पडल्याने शेतांमधील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर नाहीच
सध्या अधूनमधून पडलेल्या सरींमुळे पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी अजूनही मोठय़ा पावसाची गरज आहे. या वळीवामुळे शिवारांमध्ये पाणी साचून राहिले होते. यामुळे शेतीत मशागत करणेही लांबणीवर पडले होते. अधूनमधून सरी कोसळत आहेत. दिवसभर पावसाची उघडीप राहिली तरी पहाटे मात्र पावसाच्या काही सरी कोसळत आहेत. तर काहीवेळा रात्रीही पाऊस पडत आहे. पाऊस पडत असला तरी त्याला म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे अजून जोरदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.









