परिवहनच्या मोफत बससेवेला प्रचंड गर्दी; विद्यार्थिनींची गैरसोय : खासगी वाहनांनी प्रवास करण्याची वेळ
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेस सरकारने दिलेल्या मोफत बससेवेला महिलांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. बसफेऱ्या कमी पडत असल्याने महिलांना खासगी वाहनांना पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महिलांतून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. बस नियमित करून बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी महिलावर्गातून होऊ लागली आहे.
राज्यात रविवारपासून महिलांसाठी शक्ती योजनेंतर्गत मोफत बस प्रवास सुरू झाला आहे. या योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे. विविध मार्गांवर महिलावर्गाने भरलेल्या बसगाड्या धावू लागल्या आहेत. मात्र काही ठिकाणी बसगाड्या भरून धावत असल्याने बसथांब्यांवर न थांबताच पुढे जात आहेत. त्यामुळे महिला आणि विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. काही बसमध्ये महिला लोंबकळत प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे महिलांना मोफत प्रवासाचा धोका निर्माण झाला आहे. याकडे परिवहन लक्ष देणार का? हे आता पहावे लागणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून स्थानिक आणि लांबपल्ल्यासाठी विविध मार्गांवर बसेस धावतात. दरम्यान महिला प्रवाशांच्या संख्येतदेखील झपाट्याने वाढ झाली आहे. त्या तुलनेत बसगाड्या आणि बसफेऱ्या कमी असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. काही बसथांब्यांवर महिलांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. काही ठिकाणी बसगाड्या जागेवरून भरून येत असल्याने न थांबताच पुढे जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे महिलांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी आर्थिक फटकादेखील बसू लागला आहे. त्यामुळे विविध मार्गांवर बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थिनींची गैरसोय
मोफत बससेवा सुरू असली तरी विविध ठिकाणी शालेय विद्यार्थिनींची गैरसोय होऊ लागली आहे. बसफेऱ्या अनियमित आणि कमी झाल्याने विद्यार्थिनींना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महिलांना मोफत बससेवा देण्याआधी बसफेऱ्या आणि नवीन बसेस वाढविण्याची गरज असल्याची खंतदेखील काही विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.
परिवहनच्या ताफ्यात जुन्या बसचा भरणा
परिवहनच्या ताफ्यात जुन्या आयुर्मान संपलेल्या बसचा भरणा अधिक आहे. त्यामुळे बससेवा पुरविताना अडचणी येऊ लागल्या आहेत. निधीची चणचण असल्याने गतवर्षी बीएमटीसीकडून 100 जुन्या बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे सार्वजनिक प्रवास वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. विशेषत: महिलांसाठी सुरू केलेल्या मोफत बससेवेला याचा फटका बसू लागला आहे.









