मणिपूर घटनेची पुनरावृत्ती, तृणमूल कार्यकर्त्यांचे कृत्य असल्याचा आरोप
► वृत्तसंस्था / कोलकाता
मणिपूरमध्ये जवळपास 3 महिन्यांपूर्वी महिलांची विवस्त्र धिंड काढून नंतर त्यांची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने साऱ्या देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच पश्चिम बंगालमध्येही असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे, या राज्यातही एका महिलेला विवस्त्र करुन तिची धिंड काढण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील पिडीत महिला भाजपची कार्यकर्ती असून तिने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात या संदर्भात तक्रार सादर केली आहे. 8 जुलैला राज्यात पंचायत निवडणुका होत असताना आपली अशा प्रकारे विटंबना करण्यात आली, अशी तक्रार तिने सादर केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या 40 कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला. आपल्याला जबर मारहाण केली आणि विवस्त्र करुन आपली धिंड काढली असे या महिलेने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.
आरोपींची नावेही नमूद
या महिलेने तिची विटंबना करणाऱ्या आरोपींची नावेही तक्रारीत नमूद केली आहेत. तृणमूलचा पंचायत उमेदवार हिमांता रॉय, याच पक्षाचे कार्यकर्ते नूर आलम, अल्फी एस. के. रणबीर पांजा संजू, सुकमल पांजा, अली शेख यांच्यासह अनेकांची नावे तक्रारीत देण्यात आली आहेत. या लोकांनी आपल्याला मारहाण करुन आपल्यावर अनेक लोकांसमोर बलात्कार केला. आपली विवस्त्र धिंड काढण्यात आली आणि नंतर आपल्याला मतदानकेंद्रातून धक्के मारुन बाहेर काढण्यात आले. पोलिस स्थानकात आपली तक्रारी प्रारंभी नोंदवूनही घेण्यात आली नाही, अशी सविस्तर तक्रार तिने सादर केली असून चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे त्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती पूर्णत: बिघडली आहे. भाजपच्या महिला कार्यकर्तीवर ओढवलेला हा प्रसंग अत्यंत घृणास्पद असून यासाठी तृणमूल काँग्रेस थेट उत्तरदायी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रसंगाची पूर्ण जबाबदारी स्वीकारुन त्वरित पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्य भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी शुक्रवारी केली.
मणिपूरप्रमाणेच दु:खदायक
पश्चिम बंगालमध्ये घडलेला हा घृणास्पद प्रकार मणिपूरमधील घटनेइतकाच लज्जास्पद आणि निंदनीय आहे. मात्र, तो दडपून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपच्या खासदार लॉकेट बॅनर्जी यांनीही या प्रसंगाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ही माहिती देतांना त्यांना रडू कोसळले. पश्चिम बंगाल राज्य भाजप शाखेचे अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.









