प्रतिनिधी /वास्को
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपाने सुरू केलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गंत वास्को मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांतर्फे चार हजार घरांवर तिरंगा फडकावण्यात येईल अशी माहिती वास्को भाजपा मंडळाने दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार दाजी साळकर यांनी यावेळी केले.
सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दाजी साळकर यांच्यासह वास्को भाजपा मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक व प्रदेश कार्यकारीणी सदस्य जयंत जाधव यांनी अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली.मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर तसेच नगरसेविका क्षमी साळकर यावेळी उपस्थित होत्या. आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकावण्याची संधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासियांना लाभलेली आहे. या संधीचा लाभ देशबांधवांनी घ्यावा असे आवाहन मंडळ अध्यक्ष दीपक नाईक यांनी पेले. हर घर तिरंगा अंतर्गंत वास्कोतील चार हजार घरांवर भाजपातर्फे तिरंगा फडकावण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रध्वज चार केंद्रांमधून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जास्तीत जास्त घरांवर राष्ट्रध्वज लावले जातील यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्न करतील.अमृत महोत्सवानिमित्त वास्कोत प्रभात फेऱया सुरू करण्यात आलेल्या आहेत. 13 रोजी दुचाकी रॅली असेल. 14 रोजी मशाल मिरवणुक होईल.त्यानंतर 15 रोजी सर्वत्र होणाऱया स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाला भाजपा कार्यकर्ते उपस्थित राहतील.
तिरंगा गर्वाने फडकावा ही प्रत्येक भारतीयांची भावना असून राष्ट्रध्वज देश बांधवांमध्ये गर्वाची भावना निर्माण करीत असतो. सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा व अमृत महोत्सवातील अन्य उपक्रमांमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होऊन तिरंग्याप्रती असलेल्या गर्वाचे दर्शन घडवावे असे आवाहन आमदार दाजी साळकर यांनी केले. ध्वजारोहण करताना ध्वजाचा सन्मान राखला जावा याची काळजी घेण्याचे आवाहन आमदार साळकर यांनी केले. प्लास्टीक ध्वज कुणीच वापरू नयेत असे आवाहन जयंत जाधव यांनी यावेळी केले.









