प्रतिनिधी /बेळगाव
मागील दहा-पंधरा दिवसांपासून बस्तवाड (हलगा) गावात एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घालून अनेकांच्या घरगुती साहित्याचे मोठे नुकसान केले आहे. शिवाय अनेकांना ओरबाडून जखमी केल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत ग्राम पंचायतीकडे तक्रार करूनदेखील दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मारुती दुदाप्पा चौगुले, कल्लाप्पा शंकर परीट, मनोज रायण्णा मरगाण्णाचे आदींच्या घरांतील आरसे, खिडक्मया आणि दुचाकींचे या माकडाने नुकसान केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दरम्यान, अनेकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रसंगही घडत आहे. या माकडाने अनेकांना ओरबाडून किरकोळ जखमी केले आहे. अनेकांच्या घरांची कौले, काचा आणि इतर घरगुती साहित्याचे नुकसान केले आहे. आंबे, पेरू आणि केळीच्या झाडांचेही नुकसान केले आहे. बस्तवाडमध्ये काही दिवसांपासून हैदोस घातलेल्या या माकडाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









