दर्शनासाठी भाविकांची गर्दी

वार्ताहर /किणये
तालुक्यात मंगळवारी अंगारकी संकष्टीनिमित्त मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध गावातील गणेश मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. अभिषेक तीर्थप्रसाद व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप काही मंदिरांमध्ये झाले. अंगारकी संकष्टीनिमित्त गणेश मंदिरांना आकर्षक अशी विद्युतरोषणाई करण्यात आली होती. तसेच फुलांची सजावट केली होती.
सकाळी गणेशमूर्तीची विधिवत पूजा, अभिषेक कार्यक्रम झाले. दिवसभर भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. अंगारकी संकष्टीनिमित्त काही भक्तांनी दिवसभर उपवास केला होता. गणपतीला दुर्वा, लाल फुले वाहून भाविक दर्शन घेताना दिसत होते. ठिकठिकाणी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येत होते. मार्केटयार्डजवळील मार्कंडेयनगर येथील वरद सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी साजरी करण्यात आली. यानिमित्त मल्लिकार्जुन सत्तेगिरी यांच्या उपस्थितीत अभिषेक कार्यक्रम झाला.स्वामीनगर, मच्छे येथील श्वेतार्क गणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दिवसभर परिसरातील भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. रात्री नऊ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील भजनी मंडळांचा जागर भजनाचा कार्यक्रम मंदिरांत झाला.









