चिपळूण :
शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये नगर परिषदेने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत यावर्षीही कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच राज्यात १४वे, तर देशपातळीवर ८७वे मानांकन मिळवले आहे. हे यश पाहता अधिकारी, कर्मचाऱ्यांची मेहनत कामी आली असून नागरिकांचे योगदानही महत्वाचे ठरले आहे.
नगर परिषदेकडे उपलब्य असणाऱ्या साधनसामुग्रीद्वारे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे १०० टक्के संकलन, वर्गीकरण, निर्माण होणारा ओला, सुका व घरगुती घातक कचऱ्यावर प्रक्रिया, मैला संकलन, त्यावर शास्त्रोक्तरित्या प्रक्रिया, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, शहर सफाई आदी कामे नगर परिषदेतर्फे करण्यात येतात. यामुळे कायम शहर स्वच्छ व सुंदर दिसून येते. यामुळे दरवर्षी नगर परिषद शासनाच्या वरील अभियानात सहभागी होते. यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रशासन नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करते. त्यामुळे नागरिकांचीही मोठी साथ मिळते.
यावर्षी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत शहराच्या स्वच्छतेची, कचरा प्रकल्पाची काही महिन्यांपूर्वी पाहणी करण्यात आली होती. तसेच नागरिकांच्या स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार कचरा मुक्त शहराचे तारांकित मानांकन म्हणून वन स्टार व हागणदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ प्लस प्लस मानांकनही प्राप्त झाले आहे.
तसेच नगर परिषदेला ५० हजार ते ३ लाख लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये देशपातळीवर ८७वे, महाराष्ट्रात १४वे मानांकन तर कोकण विभागातून पहिले मानांकन मिळाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२३मध्येही यश मिळवताना नगर परिषद कोकणाल पहिली आली होती. तर आताही यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी या अभियानात देशातील ४ हजार ५८९ नगर पंचायत, नगर परिषद व महानगरपालिकानी सहभाग घेतला होता. हे यश मिळवण्यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, शहर समन्वयक पूजा शिंत्रे, आरोग्य विभागातील कर्मचारी, मुकादम, स्वच्छतादूत, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील स्वच्छतादूत यांच्यासह नागरिकांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.
- हे सर्वांच्या मेहनतीचे गोड फळ
नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, शहर समन्वयक, मुकादम, स्वच्छतादूत यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या यशस्वीतेसाठी घेतलेली विशेष मेहनत, नागरिकांचा मोठा सहभाग, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी केलेले सहकार्य यामुळे हे मोठे यश मिळाले आहे. नगर परिषदेला मिळालेले हे यश सर्वांचे आहे. यापुढे होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये यापेक्षाही अधिक गुण मिळवून चिपळूणचा नावलौकिक राष्ट्रीय व राज्यस्तरावर उंचावला जाईल. शहरात स्वच्छतेशी निगडित मोहीम व उपक्रम घेऊन प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
– विशाल भोसले, प्रशासक तथा मुख्याधिकारी, चिपळूण








