वानखेडेवर क्लासेनचे 61 चेंडूत तुफानी शतक : गतविजेत्या इंग्लंडचा 229 धावांनी दारुण पराभव :
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसी वर्ल्डकपमध्ये शनिवारी वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. सुरुवातीला आफ्रिकन फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची येथेच्छा धुलाई करताना त्यांच्यासमोर विक्रमी 400 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 22 षटकांत 170 धावांवर आटोपला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये मागील सामन्यात अफगाणिस्तानने पराभूत केल्यानंतर त्यांना आफ्रिकेविरुद्ध तब्बल 229 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुणतालिकेत आता आफ्रिकेने सहा गुणासह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे तर इंग्लंडची नवव्या स्थानी घसरण झाली आहे.
इंग्लिश फलंदाजांचा सुपर फ्लॉप शो
प्रारंभी, आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 400 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या दहा षटकांत चार गडी गमावले होते. सलामीवीर जॉनी बेअरस्टो 10, डेव्हिड मालन 6, जो रुट 2 तर बेन स्टोक्स 5 धावा काढून स्वस्तात बाद झाले. यावेळी इंग्लंडची 4 बाद 38 अशी स्थिती झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि बटलरने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण बटलर अवघ्या 15 धावांवर बाद झाला. ब्रुकला 17 धावांवर कोटीजने तंबूचा रस्ता दाखवला. अनुभवी डेविड विली व आदिल रशीद हे स्वस्तात बाद झाल्याने इंग्लंडची 7 बाद 84 अशी स्थिती झाली होती. पण, तळाचा फलंदाज अॅटिन्सन 21 चेंडूत 7 चौकारासह 35 व मार्क वूड 17 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारासह नाबाद 43 धावा करत संघाला 170 धावापर्यंत मजल मारुन दिली. अॅटिन्सन बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव 22 षटकांत संपुष्टात आला. आफ्रिकेकडून कोटीजने 3, एन्गिडी व जान्सेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मात्र चांगलाच चुकीचा ठरला. नियमित कर्णधार टेंबा बवुमाच्या अनुपस्थितीत उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्याच चेंडूवर डीकॉकच्या रुपाने पहिला धक्का बसला. डिकॉक 4 धावा काढून बाद झाला. यानंतर दुसऱ्या गड्यासाठी रिझा हेंड्रिक्स व रासी वॅन डर ड्युसेन यांनी 121 धावांची भागीदारी रचली. हेंड्रिक्सने 75 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारासह 85 तर ड्युसेनने 8 चौकारासह 60 धावा केल्या. अर्धशतकानंतर ड्युसेनला आदिल रशीदने बाद केले. या सामन्यात कर्णधार म्हणून खेळत असलेल्या एडन मार्करमने 42 धावांचे योगदान दिले. डेव्हिड मिलरही स्वस्तात बाद झाला, तेव्हा आफ्रिकेने 37 षटकांत 5 बाद 243 धावा केल्या होत्या. लागोपाठ दोन विकेट पडल्याने आफ्रिकेची धावगती काहीशी मंदावली होती.
वानखेडेवर क्लासेन-जान्सेनचे वादळ
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्य हेन्री क्लासेन आणि सातव्या क्रमांकावर मार्को जान्सेन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची पुरती धुलाई करताना धावांचा पाऊस पडला. या दोघांनी शेवटच्या 10 षटकात तब्बल 143 धावाचा पाऊस पाडत संघाला चारशे धावापर्यंत मजल मारुन दिली. शेवटच्या षटकात फक्त पाचच धावा निघाल्याने आफ्रिकेचा चारशेचा 400 आकडा पार होऊ शकला नाही. क्लासेनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार मारले. 162.68 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत क्लासेनने एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने 67 चेंडूत 109 धावा केल्या तर जान्सेनही त्याला चांगली साथ देताना 42 चेंडूत 3 चौकार व 6 षटकारासह नाबाद 75 धावा केल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी रचली. क्लासेन अखेरच्या षटकांत बाद झाला. यानंतर जेराल्डने 3 धावा केल्या तर केशव महाराज एका धावेवर नाबाद राहिला. अखेरच्या षटकात केवळ पाच धावा निघाल्याने आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा चारशे धावांचा टप्पा पार करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडकडून रीस टोपलीने 3 बळी घेतले. अॅटिन्सन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
विशेष म्हणजे, वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध एखाद्या संघाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. या बाबतीत आफ्रिकेने पाकिस्तानला मागे टाकले आहे. पाकिस्तानने 2019 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध 8 बाद 348 धावा केल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 50 षटकांत 7 बाद 399 (हेंड्रिक्स 85, ड्युसेन 60, मार्करम 42, क्लासेन 109, जान्सेन नाबाद 75, टोपली 88 धावांत 3 बळी, रशीद व अॅटिन्सन प्रत्येकी दोन बळी).
इंग्लंड 22 षटकांत सर्वबाद 170 (अॅटिन्सन 35, मार्क वूड 17 चेंडूत नाबाद 2 चौकार व 5 षटकारासह 43, जोस बटलर 15, जेराल्ड कोटीज 35 धावांत 3 बळी, एन्गिडी व जान्सेन प्रत्येकी दोन बळी).
वर्ल्डकपमध्ये जलद शतक झळकावणारा क्लासेन सहावा फलंदाज
आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्लासेनने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 61 चेंडूत शतक ठोकलं आहे. क्लासेनचे वनडे कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. मुंबईच्या जीवघेण्या गरमीशी झुंज देत क्लासेनने ही तुफानी खेळी खेळली. या सामन्यात असे अनेक प्रसंग आले जेव्हा क्लासेन स्नायूंच्या दुखण्याने त्रासलेला दिसला. पण वेदनेने आणि घामाने चिंब झालेल्या क्लासेनने शेवटपर्यंत मैदान सोडले नाही. या शतकी खेळीसह तो वर्ल्डकपमध्यश जलद शतक झळकावणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे.
विश्वचषकातील सर्वात जलद शतके
- 49 चेंडू- एडन मार्करम वि. श्रीलंका, दिल्ली 2023
- 50 चेंडू – केविन ओब्रायन वि इंग्लंड, बेंगळुरू 2011
- 51 चेंडू – ग्लेन मॅक्सवेल वि श्रीलंका, सिडनी 2015
- 52 चेंडू – एबी डिव्हिलियर्स वि वेस्ट इंडिज, सिडनी 2015
- 57 चेंडू – इऑन मॉर्गन वि अफगाणिस्तान मँचेस्टर, 2019
- 61 चेंडू – हेनरिक क्लासेन वि इंग्लंड, मुंबई 2023
शेवटच्या दहा षटकांत आफ्रिकेचा असाही विक्रम
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या दहा षटकामध्येच धावांचा पाऊस पाडून सामना फिरवण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी शेवटच्या 10 षटकात 137 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी शेवटच्या 10 षटकात एकूण 79 धावा केल्या होत्या, तर आज हे दोन्ही पराक्रम मोडीत काढत इंग्लंडविरुद्ध 143 धावा फटकावल्या. यामुळे त्यांना 399 धावापर्यंत मजल मारता आली.
लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लड गुणतालिकेत नवव्या स्थानी
सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची खराब कामगिरी सुरूच आहे. इंग्लंडला 4 सामन्यांत तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला आहे. त्यांचा एकमेव विजय बांगलादेशविरुद्ध आला होता. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने तिसरा विजय मिळवला आहे. आफ्रिकेने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यांचा एकमेव पराभव नेदरलँडविरुद्ध झाला. इंग्लंडचा पुढील सामना 26 ऑक्टोबरला बेंगळूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. याचवेळी 24 ऑक्टोबरला आफ्रिकन संघ बांगलादेशविरुद्ध मुंबईतच खेळणार आहे.









