बेळगाव : बेलगाम एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी शाळेच्या क्रीडांगणावर उत्साहात झाले. बेळगावच्या दंतवैद्य नेत्रा मनोज सुतार यांच्या हस्ते शांतीदूत कबूतर आकाशात उडवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये हे गौरव अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. अपूर्वा अंबोजीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींकडून पथसंचलन करण्यात आले. अंजली पाटीलने क्रीडा ज्योत फिरविली. कावेरी भोसलेने शपथ देवविली.
प्रमुख पाहुण्या डॉ. नेत्रा सुतार यांनी विद्यार्थी जीवनात खेळाला खूप महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने शाळेत आयोजन केलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये आवडीने भाग घ्या व शरीर आणि मन सदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा. स्पोर्ट्सच्या आयोजनाने आणि त्यामध्ये भाग घेतल्याने वक्तशीरपणा, सहकार, अभिव्यक्ती इत्यादी गुण अंगी वाढतात. त्यामुळे प्रत्येक जण आवडीने खेळ खेळा, असे सांगितले. दहावीच्या विद्यार्थिनीनी स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक एम. के. मादार यांनी पाहुण्यांचा परिचय करून सर्वांचे स्वागत केले. वैष्णवी सुपे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अदिती सुभेदार हिने आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे क्रीडाशिक्षक बलराम जैनोजी यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होते.









