कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यतील कसबा बीड येथील नदीच्या पाण्यात पडलेल्या महिलेचे प्रेत कोगे-बहिरेश्वर बंधाऱ्यात सापडले आहे. आज सकाळी बहिरेश्वर गावातील मासेमारी करणाऱ्या काही युवकांना बहिरेश्वर बंधाऱ्याच्या 14 व 15 पिलरच्या दरम्यान महिलेचे प्रेत दिसले. तात्काळ त्यांनी गावच्या पोलीस पाटील यांना बोलावून घेतले. घटनास्थळावरुन पोलीस पाटील यांनी करवीर पोलीस स्टेशनला मोबाइलव्दारे नोंद केली.
सदर महिला कसबा बीड गावची श्रीमती नकुशाबाई परशुराम सातपुते वय 75 ही महिला नदीला धुणे धुण्यासाठी आली असता पाय घसरून पडली. कानात फुले, पिवळे लुगडे व गळ्यात वारकरी माळ यावर त्यांची ओळख पटली. सर्वसामान्य कुटुंबातील मोलमजुरी करून कुंटुंब चालविणारी श्रीमती सातपुते यांचा नातवास खूप मोठा आधार होता. त्याचे बंधाऱ्यात प्रेत सापडले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, रोहित दिंडे, अक्षय काशीद, पंडित वरुटे, सर्पमित्र सुशांत नाळे घटनास्थळावर पोहचून बहिरेश्वर गावातील ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. शवविच्छेदनासाठी शासकिय रूग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे. या घटनेची करवीर पोलीस स्टेशनला नोंद झाली असून अधिक तपासपोलीस हवालदार राजू हांडे व पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण करत आहेत.