मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : बस्तवाड – हलगा येथे भव्य सत्कार
वार्ताहर /किणये
आगामी काळात बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या विकासाला अधिक गती देण्यात येणार आहे. या क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. राज्य सरकारच्या गॅरंटी योजना अमलात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे, असे मनोगत कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बस्तवाड हालगा येथे व्यक्त केले. बस्तवाड हलगा परिसरातील नागरिकांच्यावतीने महिला आणि बालकल्याण खात्याच्या कर्नाटक राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा रविवारी भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या. हेब्बाळकर पुढे म्हणाल्या गृहलक्ष्मी योजनेचा लाभ महिलांना सुरळीतपणे घेता यावा, अर्ज भरताना कोणताही गोंधळ होऊ नये व या योजनेसाठी नवीन अॅप तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा बस्तवाड भागातील नागरिकांच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. दुपारी दिव्यांगांना मोफत दुचाकी वाहनाचे वितरणही मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बेनकनहळळी येथे बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, युवराज कदम, मृणाल हेबाळकर आदींसह तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









