शहर सेवेत दाखल : एकूण 25 जुन्या बस येणार : केवळ शहरापुरता मर्यादित सेवा : बेळगाव विभागात 200 हून अधिक बसेसची कमतरता
प्रतिनिधी / बेळगाव
बीएमटीसीने भंगारात काढलेल्या चार बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शहरी भागातील इतर बसवरील ताण काहीसा कमी झाला आहे. वडगाव, सुळेभावी, काकती या भागात बस सोडल्या जात आहेत. बेळगावसाठी एकूण 25 आयुर्मान संपलेल्या बस दाखल होणार आहेत. त्यापैकी चार बस सद्या समाविष्ट झाल्या आहेत.
बेंगळूर महानगर परिवहन (बीएमटीसीने) 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या 1 हजारांहून अधिक बसेस भंगारात काढल्या आहेत. दरम्यान, परिवहनकडून प्रत्येकी 50 हजार ते 1 लाख रुपये किमतीला त्या खरेदी केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात 100 बसेसची खरेदी झाली आहे. त्यातील 25 बस बेळगावच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मात्र आतापर्यंत केवळ चारच बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित बसेस कधी दाखल होणार? असा प्रश्न पडला आहे.
बीएमटीसीकडून आयुर्मान संपलेल्या बसची खरेदी केली जात आहे व त्यानंतर त्या बसची दुरुस्ती करून मॉडिफिकेशन केले जात आहे आणि विविध ठिकाणी प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल केले जात आहे. बेळगाव विभागातील धारवाड आणि हुबळीच्या ताफ्यातदेखील या बसेस दाखल होणार आहेत. दाखल झालेल्या बसेस केवळ शहरापुरता मर्यादित सेवा देणार आहेत.
बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र आणि गोवा राज्याची हद्द लागून असल्याने प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे धावणाऱया बसेसदेखील अधिक प्रमाणात गरजेच्या आहेत. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांना खासगी वाहनांचाच वापर करावा लागत आहे. बेळगाव विभागात 200 हून अधिक बसेसची कमतरता आहे. मात्र बीएमटीसीकडून केवळ 25 बस खरेदी केल्या गेल्या आहेत. त्याही आयुर्मान संपलेल्या आहेत. दुरुस्त करून पुन्हा सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या किती दिवस सुरळीत रस्त्यावर चालणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनामुळे परिवहनला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट आहे. दरम्यान, शासनाकडूनही अनुदान थांबले आहे. त्यामुळे परिवहनने बीएमटीसीच्या जुन्या गाडय़ा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 25 गाडय़ा बेळगाव ताफ्यात दाखल होणार असल्या तरी आतापर्यंत केवळ चारच बस दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसेस कधी दाखल होणार? असाही प्रश्न पडला आहे.
इंधन दरवाढ सातत्याने होत आहे. त्यातच मागील चार वर्षांत तिकीट दरात भाडेवाढ झाली नाही. त्यामुळे परिवहनला बससेवा पुरविताना अडचणी निर्माण होत आहेत. नवीन बस खरेदी करण्यासाठी निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे आहे त्या बसवरच प्रवाशांना बससेवा पुरविली जात आहे.









