वृत्तसंस्था/ मुंबई
स्लोव्हेनिया येथे सुरू असलेल्या आयटीटीएफच्या विश्व युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या जेनिफर व्हर्गीस आणि दिव्यांशी भौमिक यांनी 15 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात जेनिफर आणि दिव्यांशी यांनी फ्रान्सची होचर्ट आणि चीनची झेंग यांचा 14-12, 11-9, 11-8 अशा (3-0) सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता अंतिम लढतीत जेनिफर आणि दिव्यांशी यांची गाठ जपानच्या ओजिओ आणि ताकामोरी यांच्याशी होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या या स्पर्धकांनी किमान आपले एक पदक निश्चित केले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या सांघिक स्पर्धेत भारताने 19 वर्षाखालील मुलींच्या सांघिक विभागात कांस्यपदक मिळविले होते.









