यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी, अर्थात 20 मे या दिवशी होणार आहे. या टप्प्यात 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघात मतदान होणार असून अनेक मोठ्या नेत्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. या टप्प्यातील मतदानासमवेतच लोकसभेच्या 543 पैकी 429 मतदारसंघांमधील मतदान पक्रिया पूर्ण होईल आणि यंदाच्या लोकसभेतील बलाबलही बव्हंशी मतदान यंत्रांमध्ये बद्ध झालेले असेल. मात्र, ते स्पष्ट होण्यासाठी 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या टप्प्यात कोणते प्रदेश आणि कोणत्या मतदारसंघांमध्ये स्पर्धा आहे, याचा हा आढावा…
कोणत्या राज्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण…
- चौथ्या टप्प्यातील मतदानासमवेत संपूर्ण दक्षिण भारतात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केरळ (20 जागा), तामिळनाडू (39 जागा), आंध्र प्रदेश (25 जागा), तेलंगणा (17 जागा), कर्नाटक (28 जागा), गोवा (2 जागा), गुजरात (26 जागा), राजस्थान (25 जागा), मध्यप्रदेश (29 जागा), उत्तराखंड (5 जागा), छत्तीसगड (11 जागा), आसाम (14 जागा) ही राज्ये आणि अंदमान-निकोबार (1 जागा), लक्षद्वीप (1 जागा), पुदुच्चेरी (1 जागा), दीव-दमण आणि दादरा-नगरहवेली (2 जागा) हे केंद्रशसित प्रदेश येथील मतदान पूर्ण झाले आहे. तसेच, ईशान्येकडील त्रिपुरा (2 जागा), मणीपूर (2 जागा), मेघालय (2 जागा), अरुणाचल प्रदेश (2 जागा), नागालँड (1 जागा), मिझोराम (1 जागा), सिक्किम (1 जागा) येथील मतदानही आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये पूर्ण झालेले आहे.
कोणती राज्ये राहिलीत…
- उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडीशा, हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश ही राज्ये आणि चंदीगढ, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश अशा भागांमध्ये अद्याप मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्र आणि लडाख आणि जम्मू-काश्मीर येथील मतदान पूर्ण होईल.
मतगणनेदिवशी कोणती राज्ये लक्षवेधी ठरणार…
- मतगणनेदिवशी महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि हरियाणा ही राज्ये प्रामुख्याने लक्ष ठेवण्यासारखी आहेत, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. कारण त्यांनी या राज्यांना या निवडणुकीत निर्णायक राज्ये किंवा स्विंग स्टेट्स् असा परिचय दिलेला आहे. परिणामी, तेथील मनगणनेवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
पाचव्या टप्प्यातील लक्षवेधी मतदारसंघ
लडाख (लडाख), नाशिक, मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण (महाराष्ट्र), बोलंगीर. कंधमाल (ओडीशा), लखनौ, अमेठी, रायबरेली, कैसरगंज (उत्तर प्रदेश), बराकपूर, हावडा, हुगळी (पश्चिम बंगाल), हजारीबाग (झारखंड)
पाचवा टप्पा कोणासाठी महत्वाचा…
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 49 मतदारसंघांपैकी सर्वाधिक 35 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 43 जागांवर विजय मिळविला होता. काँग्रेसच्या हाती केवळ 1 जागा लागली होती. तर इतर पक्ष 7 जागांवर विजयी झाले होते. त्यामुळे हा टप्पा भारतीय जनता पक्षासाठी सर्वात महत्वाचा आहे. या पक्षाला सलग तिसऱ्यांना लोकसभेत बहुमत मिळणार की नाही, हे या टप्प्यात अधिक दृढपणे निर्धारित होणार आहे. काँग्रेससाठीही हा टप्पा आव्हानात्मक असून मागच्या निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या पक्षाला प्रयत्न करावे लागतील. विरोधी पक्षांच्या आघाडीतील समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आदी पक्षांनाही मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. बिजू जनता दल या ओडीशातील पक्षाला आपल्या जागा राखण्यासाठी जोरदार स्पर्धा करावी लागणार आहे. थोडक्यात सांगायचे, तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना आपले मागच्या निवडणुकीतील यश राखण्यासाठी, तर विरोधी पक्षांच्या आघाडीला मागचे अपयश रोखण्यासाठी झगडायचे आहे.
यंदाच्या चौथ्या टप्प्यासह 2019 मधील कामगिरी
- यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या चौथ्या टप्प्यासह आतापर्यंत 380 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुजरामधल्या सुरत मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने निर्विरोध विजय मिळविला आहे. त्यामुळे या पक्षाच्या नावावर मतगणनेआधीच 1 जागा नोंद करण्यात आलेली आहे.
- या 380 मतदारसंघांपैकी 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 206 जागांवर विजय प्राप्त केला होता. तर भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 248 जागा मिळालेल्या होत्या. काँग्रेसला 48 तर काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला 84 जागा मिळालेल्या होत्या.
- पाचव्या टप्प्यासह पुढचे दोनही टप्पे आता भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. या तीनही टप्प्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच वर्चस्व 2019 च्या निवडणुकीत राहिले होते, असे आकडेवारी सांगत आहे.
- पाचव्या टप्प्यासह ऊर्वरित तीनही टप्पे मतदारसंघांच्या दृष्टीने लहान पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निर्णयाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांना याच तीन टप्प्यांमध्ये सर्वाधिक शक्ती पणाला लावाली लागणार आहे. कारण, जो पुढे जाईल, तो जिंकणार हे स्पष्ट आहे.










