वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबी क्लस्टर पातळीवरील प्राथमिक शाळांच्या क्रीडास्पर्धा दि. 1 जुलै रोजी कणकुंबी येथे पार पडल्या. स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर होते. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटोपूजन करण्यात आले.
कणकुंबी केंद्रातील कणकुंबी, पारवाड, चोर्ला, चिखले, बेटणे, माण, हुळंद आदी प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रारंभी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक एस. आर. आवताडे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले.
यावेळी एसडीएमसीचे माजी अध्यक्ष प्रभाकर पंडित, विद्यमान उपाध्यक्षा ममता नाईक, सदस्य गोपाळ नाईक, सुनील नाईक, संतोष गावडे, सुरेश गावडे, अनंत कांबळे, रफिक टेंगीनगेरी, चिखले शाळेचे मुख्याध्यापक मुल्ला, हंदीकोपवाडा शाळेचे मुख्याध्यापक सुतार, चोर्ला शाळेच्या शिक्षिका बनसुर, चिगुळे शाळेच्या मुख्याध्यापिका गोरल व पवार, हुळंद शाळेच्या मुख्याध्यापिका शिंत्रे, पारवाड शाळेच्या मुख्याध्यापिका कारेकर व हंगिरगेकर, चिखले शाळेच्या शिक्षिका कुंडेकर व नाईक, कणकुंबी शाळेच्या शिक्षिका वराळे, अत्तार, पवार इतर शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
यावेळी एस. जी. चिगुळकर यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एन. टी. हलशीकर यांनी केले तर कांबळे यांनी आभार मानले. सदर क्रीडा स्पर्धाप्रसंगी मुसळधार पाऊस असतानाही क्रीडाशिक्षक टी. एल. बिर्जे व क्रीडा शिक्षिका कुडची यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या.









