वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक परिसरात बेंदूर सण सोमवारी पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळपासूनच परिसरातील शेतकरीवर्ग बैलांना आंघोळ घालणे, शिंगांना भगवा रंग लावून सजविणे, बैलगाडी धुणे, शेतीची अवजारे धुवून पूजनासाठी ठेवत असल्याचे चित्र दिसून येत होते.
बेंदूर सणापूर्वी बैलजोडय़ांना भरपूर काम असते. बेंदूर सणापूर्वी शेतातील पेरणीची कामे व इतर कामे संपविली जातात. भात सुगी आल्यानंतर बैलजोडय़ांना शेतीची कामे लागतात. म्हणून बेंदूर सणादिवशी सर्व जनावरे व शेतीची अवजारे स्वच्छ धुऊन संध्याकाळी तांदळाच्या पिठापासून तयार केलेल्या उंडय़ांचा शेती अवजारांना नैवेद्य दाखवून बैलजोडी व म्हशींनाही खाऊ घालून पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी पांढऱया रंगाने शेती अवजारे, बैलगाडी, जनावरांचा गोठा चुन्याने रंगविणे आदी कामे करण्यात आली.
बैलजोडींना अधिक महत्त्व
भगवान श्री शंकराचे वाहन नंदी आहे. यामुळे बैलांकडे दैवी आध्यात्म्य म्हणून पाहिले जाते. बेंदूर सणादिवशी बैलांना शेतकरी बांधव सजवून आपले आध्यात्मिक महत्त्व जोपासतात.
नवदांपत्यांचा पहिला सण
नवदांपत्यांचा पहिला सण म्हणून बेंदूर सणाकडे पाहिले जाते. बेंदूर सणादिवशी नवरदेवाला माहेरची सर्व मंडळी आदराने आमंत्रण देऊन स्वागत करतात. खेडोपाडय़ात ही परंपरा पूर्वापार असून आजतागायत या परंपरेचे अवलोकन ग्रामीणसह शहरी भागातील माहेरवाशिणी करतात.









