पुणे / प्रतिनिधी :
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो’ देशातील अनेक भागातून गेली आहे. मात्र, त्यावेळी राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारे विधान केले नाही, पण महाराष्ट्रामध्येच आल्यावर त्यांनी सावरकर यांच्याबदल केलेले विधान हे जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या गोष्टीला थोडा वेळ लागेल, मात्र जे खरे आहे त्याचाच विजय होईल. शेवटी सावरकरांचाच विजय होणार असल्याचे सावरकर यांच्या कुटुंबातील सदस्य सात्यकी सावरकर (Satyaki Savarkar) यांनी नमूद केले.
सारसबाग येथील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळय़ावर हिंदू महासंघाचे आनंद दवे आणि स्वा.सावरकर यांच्या कुटुंबातील सदस्य सात्यकी सावरकर यांनी गुलाब जलाने अभिषेक केला. यावेळी सामुदायिक सावरकर गीत देखील पठण केले. यावेळी ते बोलत होते. सावरकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या नेत्यांनी देखील सावरकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. हे विरोधक असूनदेखील सावरकर यांना मानसन्मान देत असतील आणि आता राहुल गांधी सारखे तोंडाळ पुढारी सावरकर यांच्यावर चिखल फेक करीत असतील. हे त्यांच्या नेत्यांना पटणारे नाही.
अधिक वाचा : आळंदीत उद्या कार्तिकीचा सोहळा
स्वा.सावरकर यांना भारतरत्न मिळवा, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मागील सरकारमधील महाविकास आघाडीमधील ठाकरे गट राहुल गांधी यांच्या विधानामुळे दुखावला गेला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या विधानामुळे अनेक जण दुखावले गेले असून, आता काँग्रेसची याच विधानामुळे राजकीय हानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.








