चिपळूण :
डिझेलसाठी दिवसाला दोनच हजार रुपयांची मर्यादा असल्याने तालुक्यासाठी अधिग्रहित केलेला खासगी टँकर दिवसातून केवळ दोनच फेऱ्या मारत आहे. त्यातच दुसरा टँकर अधिग्रहित न केल्याने पाणीपुरवठ्यासाठी तालुक्यातील २० गावांतून अर्ज आले असले तरी आतापर्यंत केवळ ९ गावांमधील तेरा वाड्यांमध्ये टँकर पाठवला जात आहे. टैंकर एकच असल्याने प्रत्येक टंचाईग्रस्त वाडीला आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. यावर्षीही पाणीपुरवठ्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुरेसे लक्ष न दिल्याने जनतेत खदखद आहे.
यावर्षी तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असल्या तरी तालुक्यात टेरव धनगरवाडीला ३ एप्रिलला पहिला टैंकर धावला. त्यानंतर आतापर्यंत टेरव, अडरे, कोंडमळा, सावर्डे, कुडप, अनारी, कादवड, डेरवण, रेहळ भागाडी वैजी आदी ९ गावांतील १३ वाड्यांमध्ये सद्यस्थितीत टैंकर धावत आहे. प्रत्यक्षात ९ गावांमधील १३ वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागली असली तरी उर्वरित गावे, वाड्यांना टैंकर उपलब्ध होत नसल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य होऊन बसले आहे. टँकरच्याच टंचाईमुळे पाण्यासाठी सर्वत्र बोंबाबोंब सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. तसे पाहिले तर टंचाई आराखडा बैठक झाल्यानंतर गावा-गावातून टँकरचे मागणीपत्र आले. त्यानंतर शिमगोत्सवापूर्वीपासून काही ग्रामपंचायतींनी टँकरसाठी अर्ज केले. आतापर्यंत अर्जाची संख्या २० झाली असली तरी टैंकर एकच असल्याने प्रत्यक्षात ९ गावांनाच पाणीपुरवठा करावा लागत आहे. शिमगोत्सवापासून पाणी मिळत नसल्याने सध्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच टैंकरला डिझेलसाठी १ कि.मी. मागे २५ तर दिवसाला केवळ दोनच हजारची मर्यादा दिल्याने केवळ दोनच फेऱ्या होत आहेत. परिणामी सध्याची वाड्यांची संख्या लक्षात घेता ६ ते ८ दिवसांतून एकदाच टैंकर टंचाईग्रस्त वाडीत जात आहे. आता ६ हजार लिटरचा एक टैंकर आठवडाभर तेथील लोकांना कसा पुरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- खासगी टँकर ताब्यात घ्यावेत
शासनाकडे पैसे नसतील अथवा टैंकर उपलब्ध होत नसतील तर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी एमआयडीसीमधील काही खासगी कंपन्यात तसेच खासगी मालकीची टैंकर ताब्यात घेऊन तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी चिपळूण माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे








