शहरांमध्ये अलिकडच्या काही वर्षांमध्ये कावळे किंवा चिमण्यांसारखे पूर्वी नेहमी आढळणारे पक्षी दिसेनासे झाले आहेत, ही बाब आपल्या परिचयाची आहे. कावळे-चिमण्या दिसण्याचीही मारामार, तेथे पोपट कोठून दिसायला ? पण गुजरातमधील राजकोट या शहरात वास्तव्यास असणारे नवनीतभाई अग्रवाल या पक्षीप्रेमींनी एक नवाच उपक्रम हाती घेतला असून त्यांनी पोपटांशी मैत्री केली आहे. त्यामुळे त्यांच्या घरात दिवसभर सतत पोपटांची ये जा होत असते. प्रतिदिन त्यांच्या भेटण्यासाठी 200 ते 250 पोपट येतात. सगळे एकाच वेळी येत नाहीत. तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन ‘शिफ्टस्’मध्ये येतात. शहराच्या आसपा असलेल्या निमशहरी किंवा वन भागातून ते येतात. अग्रवाल त्यांचे लाड करतात. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात. तसेच त्यांच्याशी संवादही साधतात अशी चर्चा त्यांच्यासंबंधी आहे. शहराकडे पक्षी फिरकत नाहीत, ही समजूत अग्रवाल यांना मान्य नाही. उलट शेतांमध्ये अलिकडे मोठ्या प्रमाणात कीडनाशकांचा उपयोग केला जात असल्याने पक्षी शहरांकडे परतू लागले आहेत, असे अग्रवाल यांचे म्हणणे आहे. ते शहरातील प्राप्तीकर विभागाच्या कार्यालयात नोकरी करतात. काम करुन घरी आल्यानंतर ते पोपटांना भेटतात. अग्रवाल हे पक्षीप्रेमी आहेत. त्यांचे पक्षीप्रेम बऱ्याच वर्षांपासूनचे आहे. घरी आलेल्या पक्ष्यांना ते मक्याचे दाणे किंवा मक्याची भरड खायला देतात. प्रारंभीच्या काळात तीन-चार मुठी मकादाणे पुरत असत. पण आता अतिथी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने तीन-चार किलो मका लागतो. हा खर्च ते त्यांच्या वेतनातून करतात. काहीवेळा मक्याचे दाणे त्यांचे शेजारीही देतात. केवळ पोपटच नाही, तर अलिकडच्या काळात खारी आणि इतर छोट्या पक्ष्यांचेही त्यांच्या घरातील येणेजाणे वाढले आहे. साधारणत: संध्याकाळी सहा नंतर मक्याचे दाणे किंवा भरड ते घराच्या छतावर पसरुन ठेवतात. त्यानंतर चोवीस तास कोणत्या ना कोणत्या पक्ष्याचे आगमन होतच राहते.









