
प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरात घालण्यात येणाऱया गॅस वाहिनीच्या कामाने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. शहरातील भुमीगत वीज वाहिन्या तोडल्यानंतर गॅस वाहिनीचे काम करणाऱयांनी चार भुमीगत जलवाहिनीही तोडल्याने शहरातील लोकांसमोर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या प्रकाराने वास्कोत पुन्हा संताप पसरलेला असून आमदार दाजी साळकर यांनी गॅस वाहिनीचे काम बंद केले आहे. हे काम आता पावसाळय़ानंतरच हाती घेण्याच्या स्पष्ट सुचना कंत्राटदाराला केल्या आहेत.
वास्को शहरात दोन महिन्यांपूर्वी भुमीगत गॅस वाहिनी घालण्याच्या कामाला सुरवात झाली होती. या कामासाठी शहरात सर्वत्र खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत. या खड्डय़ांचा वाहतुकीला व पादचाऱयांना त्रास होत असून पावसाळय़ात धोका निर्माण होणार आहे. स्थानिक लोक या खड्डय़ांच्या अडचणीत सापडलेले असतानाच साधारण दोन आठवडय़ांपूर्वीच वास्को शहरात गॅस वाहिनीच्या कामाने भुमीगत वीज वाहिन्या तोडल्या होत्या. त्यामुळे वीज खात्याला लाखोंचा फटक बसला होता तर वीजे अभावी लोकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. वास्को शहर व परीसर तसेच मुरगाव मतदारसंघात तब्बल 22 तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज खात्याच्या नुकसानीनंतर रविवारी रात्री गॅस वाहिनीच्या कामाने भुमीगत जलवाहिनीलाही धक्का दिला. या कामामुळे मुख्य रस्त्य़ावरील टिळक मैदानासमोरील चार भुमीगत मुख्य जलवाहिन्या फुटल्या असून या प्रकारामुळे त्या रात्री त्या परीसरात पाणीच पाणी अशी स्थिती झाली होती.
शहरातील लोकांसमोर पाणी टंचाईची समस्या
जलवाहिन्या फुटल्यामुळे पाणी वाया जाण्याबरोबरच मातीही जलवाहिनीत घुसली. त्यामुळे समस्या गंभीर बनली. शहरातील लोकांना या प्रकारामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागलेले आहे. फुटलेल्या सदर जलवाहिन्या दुरूस्त करण्याचे काम काल मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरूच होते. या मुख्य मार्गाच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणी जमीनीत गेलेले आहे. या रस्त्याची जमीनही भुसभुशीत असल्याने तेथील रस्त्याचा भागही खचू लागलेला आहे. या प्रकारामुळे सुरळीत वाहतुकीतही अडथळा निर्माण झालेला आहे. गॅस वाहिनीच्या कामातील निष्काळजीपणामुळे घडू लागलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पुन्हा संताप पसरलेला आहे.
गॅस वाहिनी घालण्याचे काम बंद, ऑक्टोबरमध्येच पुन्हा सुरू होणार
वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी गॅस वाहिनीच्या कामांमुळे होणाऱया नुकसानीच्या घटनांमुळे सदर कामाच्या कंत्राटदाराला यापूर्वीच तंबी दिली होती. पावसाळय़ापूर्वी सर्व काम पूर्ण करण्याचेही त्याना बजावण्यात आले होते. मात्र, हे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे. शिवाय पावसाळय़ाच्या तोंडावर या कामाने उपद्रव निर्माण करणे सुरूच ठेवलेले आहे. घडणाऱया घटनांची दखल घेऊन आमदार दाजी साळकर यांनी गॅस वाहिनी घालण्याचे काम आता बंद करून हे काम आता पावसाळय़ानंतरच सुरू करण्याची स्पष्ट सुचना कंत्राटदाराला केली आहे. शहरात खोदण्यात आलेले सर्व खड्डे येत्या दोन दिवसांत बुजवून धोका दूर करण्याची सुचनाही करण्यात आलेली असून गॅस वाहिनी घालण्याचे काम आता बंद करण्यात आल्याचे आमदार साळकर यांनी म्हटले आहे.









