प्रतिनिधी/सातारा
सातारा शहरात राजपथावर पालिकेने सुमारे 80 लाख रुपयांचा निधी खर्च करुन लामण दिवे बसवले. त्या लामणदिव्यांचे उद्घाटन शाही पद्धतीने नुकतेच करण्यात आले. या लामणदिव्यांचा रात्री अंधार तर दिवसा उजेड असा प्रकार सुरु आहे. त्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. पालिकेने लामणदिव्यावर खर्च केलेला पैसा पाण्यात गेला की काय अशी चर्चा सुरु आहे.
राजपथावर मोती चौक ते देवी चौक या दरम्यान त्याच्या दुतर्फा आकर्षक असे लामणदिवे बसवण्यात आले आहेत. या लामणदिव्यांकरता पालिकेच्या विद्युत विभागाने खूप प्रयत्न केले. लामण दिव्यांना विद्युत कनेक्शन देण्याचे काम पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजेंच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. परंतु त्याच्याच दुसऱया रात्रीr दिव्यांचा प्रकाश पडला नव्हता. तर तिसऱया दिवशी दुपारी चार वाजताच लामणदिवे लागले असल्याने पालिकेच्या विद्युत विभागाने घेतलेले कष्ट वाया गेले. पालिकेने गुंतवलेले पैसे वाया गेले अशीच चर्चा रंगू लागली. त्याबाबत पालिकेचे विद्युत अभियंता सावळकर यांच्याशी संपर्क साधला असता काहीसे काम अपूर्ण राहिले होते. ते काम करण्यासाठी लामणदिवे रात्रीचे बंद ठेवले होते. त्याची दुरुस्ती गुरुवारी दुपारी करण्याचे काम सुरु होते, असे त्यांनी सांगितले.









