विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याअगोदर बऱ्याच क्रिकेटप्रेमींना पडलेला प्रश्न हाच होता की नऊ संघापैकी कुठला संघ आपल्याला अडचणीत आणू शकतो? काहींच मत ऑस्ट्रेलिया, काहींचे इंग्लंड तर काहींचे बांगलादेश असू शकेल. परंतु तुम्ही जर हा प्रश्न मला विचारला तर त्याचे उत्तर आहे न्यूझीलंड. फार पूर्वीपासूनच न्यूझीलंडचा संघ स्टार कलाकारांचा भरणा नसलेला संघ. परंतु मागील काही वर्षांत त्यांची कामगिरी निश्चितच डोळ्यात भरण्यासारखी. तसा किवीचा संघ हा क्रिकेटमध्ये प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. बघाना झटपट क्रिकेटमध्ये डावाचे पहिलेच षटक मंदगती गोलंदाजाकडे देण्याचा पहिला प्रयोग किवींचाच. आठवतो ना मंदगती गोलंदाज दीपक पटेल. जरी श्रीलंकेच्या कालू वितरणा आणि जयसूर्या या जोडगोळीने आक्रमकतेचा पाया जरी रचला असेल तरी पहिली वीट खऱ्या अर्थाने न्यूझीलंडच्या मार्क ग्रेट बेचने रचली. तीस यार्ड सर्कलच्या आत उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून कशी टोलेबाजी करावी, हे त्याने सर्वप्रथम क्रिकेटमध्ये दाखवून दिले. असा हा न्यूझीलंडचा संघ काहीतरी वेगळं करत संघाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत राहणं हाच त्यांचा मानस.
मी ज्या संघाकडे आदरयुक्त भीतीने बघतो तो दुसरा तिसरा कुठलाही संघ नसून तो आहे न्यूझीलंडचा संघ. नेहमीच त्यांचे खेळाडू लाईमलाईट पासून चार हात दूर राहणारे, अशा या संघाविरुद्ध खऱ्या अर्थाने भारताचा कस लागणार आहे. किंबहुना मी तर असे म्हणेन की मागील चार पेपरांपेक्षा आजचा पेपर थोडासा टफ असणार आहे. परंतु कित्येकदा भारतीय संघाने टफ वाटणारा पेपर पर्यवेक्षकांकडून पुरवण्या घेत सोपा केला आहे, हे विसरून चालणार नाही. केन विल्यम्सनच्या न्युझीलंड संघाकडे ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, विल यंग, कॉनवेसारखे झटपट क्रिकेटचा चौकडीत बसणारे चांगले फलंदाज आहेत. विशेषत: कॉन्प्वे याला आयपीएलचा चांगला अनुभव आहे. आताच्या घडीला किवी संघाकडे डॅरी मिचेल, जेम्स निशम आणि मिचल सँटेनर यासारखे तीन तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत. सदर खेळाडू प्रतिस्पर्धी संघाचे होत्याचे नव्हते कधी करतील हे सांगता येत नाही.
सदर सामना हिमालयाच्या कुशीत स्थित असलेल्या व दलाई लामा यांच्या आश्रमाने पावन झालेल्या धर्मशालामध्ये आहे. धर्मशाला सारखे मैदान जर किवींना आवडलं नाही तरच नवल. येथील मैदानात वाहणारे थंड वारे त्यांना त्यांच्या देशातील मैदानावरील वातावरणाची आठवण करून देईल. आपण हा सामना ऑकलँडला तर खेळत नाही ना याचा कदाचित भास त्यांना होत असेल. असो. आज हार्दिक पंड्याच्या बदली कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असेल. परंतु सर्वसाधारणपणे विचार केला तर पंड्याच्या जागी मोहम्मद शमीला खेळवणं केव्हाही चांगलं. कारण आपली फलंदाजी पूर्णत: मजबूत आहे. एक कमी गोलंदाज घेऊन खेळणं किवीसारख्या डार्क हॉर्स संघासमोर परवडण्यासारखं नाही. भारताने पहिल्या सामन्यात कांगारूविरुद्ध एखाद्या कसलेल्या व्यावसायिक संघाप्रमाणे खेळ केला. पाकविरुद्ध पारंपरिक संघाला कसे हरवायचं हे दाखवून दिलं. तर लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध अतिआत्मविश्वास न बाळगता कसा सोपा विजय मिळवायचा हे दाखवलं. सरते शेवटी बांगलादेशविरुद्ध तुम्ही तर आमचे सात जन्माचे वैरी आहात पण ते चेहऱ्यावर कुठलेही एक्सप्रेशन न आणता त्यांचेच दात त्यांच्या घशात कसे घालायचे हे दाखवून दिलं. दडपण आता दोन्ही संघांवर आहे. कारण विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यातील विजयी घोडदौड दोघांपैकी कोणाची एकाची निश्चित थांबणार आहे. दरम्यान, आज, विजयाचा पंजा गुणफलकावर कोण उमटवतो, हे बघण आता औसुक्याचे ठरणार आहे.









