अध्याय सविसावा
तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या
मूर्ति ।।6।। भगवंतानी सांगितलेले साधूंचे निरपेक्षता, निर्मोही, प्रशान्तता, बंधुभाव, समदर्शीपणा, निर्मम, निरभिमानी, अपरिग्रही हे आठही गुण तुकाराम बुवांनी या एकाच अभंगात गुंफले. संत साधू मंडळींनी आत्मसात केलेले गुण पाहिले की, साधकालाही आपण त्यांच्यासामान व्हावे असे वाटू लागल्यास नवल नाही. साधकाच्या मनातली ही गोष्ट ओळखून मनकवडे असलेले भगवंत, त्यावर असा उपाय सांगतात की, ही संतांची स्थिती प्राप्त होण्याकरिता त्यांचीच भक्ती करावी. भक्ती म्हणजे सदैव त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा, कठीण प्रसंगात ते कसे वागले, कुणाशी विनम्र भावाने कसे बोलले, त्यांनी भूतदया कशी दाखवली हे सगळे मनात ठसवावे. साधू संतांच्या वचनांचे चिंतन करावे, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपोआपच त्यांची कृपा प्राप्त होते व त्यांच्यातील गुण हळूहळू आपल्यात उतरू लागतात. जसजसे ते गुण आपल्यात उतरू लागतात तसतसा आपल्या स्वभावात बदल होऊ लागतो आणि त्यामुळे आपली देहाबद्दलची आसक्ती सुटते. हा देह म्हणजेच मी अशा विचारातून मला हे हवे, मला ते हवे अशी भावना वाढते. त्या त्या गोष्टी मिळाल्या तरच मी सुखी होईन. देह सुखी तर मी सुखी या समजातून देहाबद्दल माणसाला आसक्ती असते परंतु संत चरित्राच्या अभ्यासाने, त्यांच्या वचनांचा अभ्यास करून त्या वचनांचे तंतोतंत पालन केल्याने देहाबद्दलची आसक्ती आणि त्यातून निर्माण होणारी अहंता आणि ममता आपोआपच नष्ट होतात. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना उपदेश करावा लागत नाही कारण, साधू संत स्वत: सर्व यमांचे पालन कसोशीने करत असल्याने त्याचे फल म्हणून त्यांच्या संगतीत जो येईल त्याचे अवगुण आपोआपच पालटतात आणि केवळ त्यांची संगतच साधकाला देहीचा विदेही बनवते. काहीवेळा त्यांनी देह ठेवलेला असल्याने ते देहाने उपस्थित नसतात त्यावेळेस त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करूनसुद्धा साधकाचे काम भागते. असा अभ्यास करणारे आणि त्यातून इतरांना त्यांचे विचार समजावून सांगणारेही साधुंना अतिशय प्रिय असतात कारण त्यांच्या सांगण्यातून योग्य तो धडा घेऊन अनेकजण उद्धरून जातात. हे भाग्यवान उद्धवा! संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणाऱ्या माझ्या कथा चालतात. जे त्या ऐकतात, त्यांचे सगळे पाप नाहीसे होते. सगळ्यांचा समज असा आहे की, इंद्रपदापासून ब्रह्मलोकापर्यंत प्राप्ती होणे हे मोठे भाग्याचे लक्षण आहे पण सत्संगाच्यापुढे ह्या भाग्याची काहीच किंमत नाही कारण सत्संग केवळ अतुलनीय आहे. अशी सत्संगती महाभाग्यवंतांना प्राप्त होते. साधु माझ्या कथाकीर्तिचे गायन करीत भगवद्भावनेनेच वागत असतात. ती कथा अकस्मात जरी कानावर पडली तरी तत्काल कलियुगासंबंधी पातक सारे धुऊन काढते. कारण ती गंगेहूनही पवित्र आहे. जेथे माझी निजकथा गायन करतात, तेथील तीर्थेसुद्धा पवित्र होऊन जातात. अशा तऱ्हेच्या भगवंताच्या कथा-कीर्ति साधु सदासर्वदा गर्जत असतात. स्वत: भागीरथी सुद्धा नेहमी मनात चिंतन करीत असते की, कोणी साधु माझ्याकडे येईल तर माझी सारी पातके नाहीशी होऊन जातील. माझ्या मनात पार्वतीचा द्वेष असल्यामुळे मीही पातकाने बद्ध झाले आहे. तेही पातक संतचरणाने झडून जाईल. कारण, सत्संगतीने सर्व पातके धुऊन जातात किंवा ज्याच्या मुखात हरिनामाची कीर्ति असते त्याचे पाय जर माझ्या पात्रात येतील, तर माझी सारी पापे नष्ट होऊन जातील. याप्रमाणे भागीरथीसुद्धा संतांच्या संगतीची निरंतर इच्छा करते. अशा त्या संतांच्या मुखातील माझी कथा अत्यादराने श्रोता श्र्रवण करील, तर त्याचे भाग्य मलासुद्धा वर्णन करता येणार नाही. माझ्या कथेची अत्यंत आवड धरली असता तीत नित्य नवीन गोडी उत्पन्न होते आणि आदरपूर्वक ऐकिली असता, ती कोट्यावधि पापे जाळून खाक करते.
क्रमश:








