विभागीय पातळीवरील स्पर्धांची पावसातच तयारी
वार्ताहर /उचगाव
नूतन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन दीड महिना उलटला व नित्य अभ्यासक्रमांना सुरुवात झाली. तसेच शैक्षणिक वर्षातील क्रीडा स्पर्धांच्या तारखा जाहीर झाल्या. विभागीय, केंद्र पातळीवरील स्पर्धांना आता प्रारंभ होत आहे. पावसाची रिपरिप आता सुरू असतानाही शाळांच्या क्रीडांगणावर विविध खेळांचा सराव विद्यार्थ्यांकडून सुरू असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. अलीकडच्या काळात खेळाडूंना खेळण्यासाठी मुबलक असे क्रीडांगण ग्रामीण भागात दिसून येत नाही. काही ठराविक शाळा सोडल्या तर इतर सर्वत्र क्रीडांगणाअभावी विद्यार्थी खेळाकडे वळताना दिसत नाहीत. संपूर्ण बेळगाव तालुक्यातील शाळांच्या क्रीडांगणाकडे नजर टाकली असता हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शाळांना क्रीडांगण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळावे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही वर्षांपूर्वी गावाशेजारील मोकळ्या जागा होत्या. तसेच सरकारी जागाही होत्या. त्यामुळे क्रीडांगणे नसली तरी मोकळ्या जागेत खेळण्यास खेळाडूंना मुभा होती. मात्र सध्याचे चित्र पाहिले तर या जागांमधून प्लॉट काढून मोठमोठ्या इमारती, बंगले उभे राहिले आहेत. जागेसभोवती संरक्षक भिंत उभारल्याने मोकळ्या जागा गायब झाल्या. सरकारी जागांमधून समुदाय भवन, सरकारी दवाखाने, ग्रा.पं.कार्यालय, कृषी दूरध्वनी केंद्र अशा कार्यालयांनी इमारतीने या जागा व्यापल्या गेल्याने खेळाडूंची कुचंबणा होत आहे. तालुक्यातील अनेक शाळांना म्हणावी तशी क्रीडांगणे नाहीत. त्यामुळे धावण्याच्या स्पर्धा रहदारीच्या रस्त्यावर घ्याव्या लागतात. रिकाम्या जागा पाहून सांघिक स्पर्धा घ्याव्या लागतात. ख•s, गवत, दगड, माती चिखल, साचलेले पाणी याची तमा न बाळगता खेळाडूंना खेळावे लागते. सध्या या सर्व स्पर्धांचे वेळापत्रक पावसातच असल्याने चिखल आणि निसरडीचा सामना करत विद्यार्थ्यांना खेळात कौशल्य दाखवत विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागते. यासाठी लोकप्रतिनिधींनी, क्रीडामंत्र्यांनी गावोगावी क्रीडांगणे उभारण्यासाठी शासकीय निधी मंजूर करून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणाची निर्मिती करावी, अशी मागणी विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्गातून करण्यात येत आहे.









