वृत्तसंस्था / चेन्नई
विशिष्ट परिस्थितीत पत्नीने केलेली पतीची त्या हा तिच्या स्वसंरक्षणाचा अधिकारच मानला पाहिजे, असा महत्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. हत्या हा गुन्हा असला तरी स्वसंरक्षणासाठी ती केल्यावाचून पर्याय नसेल तर ती हत्या क्षम्य मानावी लागते, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयासमोर आलेल्या एका प्रकरणात पत्नीने आपल्या पतीची हत्या केली होती. हा पती दारुच्या नशेत घरी आला आणि त्याने आपल्या स्वत:च्या मुलीवरच हल्ला केला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे मुलीच्या संरक्षणासाठी पत्नीने पतीच्या डोक्यावर मागून काठीचा घाव घातला. या आघातामुळे पतीचा मृत्यू झाला आणि पत्नीवर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला. पत्नीने प्रथम मुलीच्या अंगावर पडलेल्या पतीला दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने लाकडी सुरीने त्याच्यावर वार केले. तथापि, पती मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने काठीने त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला वार केला, असे तपासातही आढळून आले होते.
पत्नीचे कृत्य क्षम्य
आपल्या मुलीचे संरक्षण करण्यासाठी पत्नीकडे त्या क्षणी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे तिने पतीवर प्रहार केला होता. अशा स्थितीत आपल्या किंवा दुसऱ्याच्या संरक्षणासाठी हत्या घडली तरी ती कायद्याने क्षम्य मानली आहे. तसेच अशी हत्या करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मद्रास उच्च न्यायालयाने पत्नीची निर्दोष मुक्तता केली आहे.









