सोलापुरात गाड्या घेण्याच्या आमिषाने फसवणूक
सोलापूर : महिंद्रा फायनान्सचे वाहन लिलाव अधिकारी असल्याचे सांगून कमी किमतीत कार, दुचाकी मिळवून देतो असे सांगून सोलापुरातील सुमारे १५ ते २० जणांची ३० लाख ३९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी ते जून २०२५ च्या दरम्यान साई मोटर्स गैरेज एमजी शोरूमच्या समोर बाळे-पुणे रोड येथे घडली.
याप्रकरणी मेकॅनिक असलेला आयुब अब्दुल शेख (वय-३७, रा. हिरज, तालुका उत्तर सोलापूर) यांनी आरोपी निलेश्वर मनोजकुमार शोधे (रा.अहिल्या एन्क्लेव्ळ, महेश गार्ड लाईन मटेरियल साफ, आर्मी हेडकॉटर, इंदौर, मध्यप्रदेश), विजय प्रताप राशंकर (रा. शांती कॉलनी महुगाव इंदौर, मध्यप्रदेश) या दोघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यातील आरोपी फिर्यादींच्या गॅरेजमध्ये काम करणारा सोमनाथ अशोक तळवळकर याला आवरा कार (एम.एच.०२ एफ एक्स २४०२) या गाडीचे मोबाईलमध्ये फोटो दाखवून ती विकत घेऊन देतो म्हणून दोन लाख रुपये घेतले. तसेच फिर्यादांच्या गॅरेजमध्येच गाड्या वॉशिंग करणारा शिवाजी देविदास सदगर यालाही ईरटीका कार (एम. एच.१७ सी एक्स २५८६) या गाडीचे फोटो मोबाईलमध्ये दाखवून ती विकत घेऊन देतो म्हणून तीन लाख रुपये घेतले.
फिर्यादीच्या गॅरेज शेजारील मन्नान इब्राहिम इनामदार याला क्रेटा कार (एम.एच.१४ के एन ९१११) या गाडीचे फोटो दाखवून सदर गाडीची किंमत ३ लाख रुपये असल्याचे सांगून त्यापैकी २ लाख ७५ हजार रुपये घेतले.
अशा विविध लोकांना विविध कार तसेच दुचाकींचे फोटो दाखवून ३१ लाख रूपये गोळा करण्यात आले. परंतु एकालाही गाडी देण्यात आली नाही. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत. लक्षात ठेवावे









