वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षात जून अखेरपर्यंत म्हणजेच गेल्या सहा महिन्यात भारतातील 87 हजार लोकांनी आपले नागरिकत्व सोडले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ही माहिती दिली. संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात परराष्ट्रमंत्र्यांनी 2011 पासून आतापर्यंत 17 लाख 50 हजार भारतीयांनी नागरिकत्व सोडल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत भारतातून परदेशात जाणाऱ्या भारतीयांबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 2022 मध्ये 2,25,620, 2021 मध्ये 1,63,370, 2020 मध्ये 85,256, 2019 मध्ये 1,44,017, 2018 मध्ये 1,34,561, 2017 मध्ये 1,33,049, 2016 मध्ये 1,41,603 भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडले. याशिवाय 2015 मध्ये 1,31,489 आणि 2014 मध्ये 1,29,328 भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडल्याचे लेखी उत्तरातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. देश सोडून जाणाऱ्या नागरिकांपैकी अनेकांनी वैयक्तिक सोयीमुळे परदेशी नागरिकत्वाचा पर्याय निवडला आहे. याशिवाय, गेल्या दोन दशकांमध्ये कामाच्या निमित्ताने विदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. भारत दुहेरी नागरिकत्व देत नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावे लागते.
भारतीयांची अमेरिकेला सर्वाधिक पसंती
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीवरून भारत सोडून परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी अमेरिकेला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येते. 2021 मध्ये एकूण 78,284 लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाला पसंती दिल्याचे सांगण्यात आले. 2021 च्या आकडेवारीनुसार 23,533 लोकांना ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व मिळाले आहे. याशिवाय पॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर ब्रिटन आणि इटली या देशांना पसंती दिली जाते.









