मुलीच्या आईलाही झाली अटक: कोलवाळ पोलिसांची यशस्वी कारवाई
वार्ताहर /थिवी
आपल्या अंगात दैवी शक्ती आहे. आपण कुठल्याही माणसामध्ये असलेली संकटे दूर करतो. जर मुलीने आपल्याला शरीरसुख दिले तर आपण आपल्या दैवी शक्तीने मुलीवर असलेली संकटे दूर करतो, असे सांगून शिरसई येथे घाडीपण करणाऱया रमाकांत नाईक (बाबा) वय 50 या व्यक्तीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्त्याचार केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी अटक केली असून याकामी त्या घाडीपण करणाऱया बाबाला सहकार्य केल्याबद्दल मुलीच्या आईलाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पिडीत मुलीची आई शिरसई येथे या रमाकांत नाईक ऊर्फ बाबा याच्या कथित आश्रमात जात होती. सोमवारी तिने आपल्या मुलीला या भोंदू बाबाकडे नेले होते. त्यावेळी या भोंदूने तिला मुलीवर कोणतेच संकट यायला नको असेल तर आपल्याला शरीर सुख दिल्यास आपण आपल्या दैवी शक्तीनुसार तिचे रक्षण करु शकतो, असे सांगितले. या गोष्टीला या आईने भोंदूबाबाला सहकार्य केले आणि मुलीला भोंदुकडे सोपविले.
पिडीत मुलीने मंगळवारी हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी पोलीस तक्रार करताच भोंदू बाबा रमाकांत नाईक याला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2 i) तसेच गोवा बाल कायदा कलम 8 आणि पॉस्को कायदा कलम 4 या तीन कायद्यांखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. म्हापसा उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजिक व उपनिरीक्षक सोनम वेरेकर यांनी ही कारवाई केली.









