भारतात अगदी प्राचीन काळापासून परदेशी पर्यटकांचे आणि प्रवाशांचे आगमन विविध कारणांस्तव होत आहे. अशा अनेक विदेशी प्रवाशांची नावे आपल्याला इतिहासात शिकविली जातात. कोणी ज्ञानाच्या शोधात, कोणी आत्मशोधासाठी, तर कोणी गमावलेल्या मन:शांतीच्या प्राप्तीसाठी भारत भूमीत आलेला आहे. तो आपली गमावलेली निद्रा किंवा झोप प्राप्त करुन घेण्यासाठी येथे आलेला आहे.
ब्रिटनचा नागरीक असलेल्या या प्रवाशाचे नाव आहे ऑलिव्हर एल्व्हीस. तो वयाच्या 18 व्या वर्षापासून ब्रिटनमध्ये रेल्वे चालविण्याचे काम करतो. त्याच्या कामामुळे असेल, किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी असेल, गेली दोन वर्षे त्याचा डोळ्याला डोळा लागलेला नाही. या दोन वर्षांमध्ये तो एक क्षणभरही झोपू शकलेला नाही. त्याला ‘इन्सोम्निया’ अर्थात ‘निद्रानाश’ हा विकार जडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याला हा विकार आहे. त्याने अनेक आधुनिक औषधे घेऊन पाहिली आहेत. तथापि, कोणतेही औषध त्याला या विकारापासून मुक्त करु शकलेले नाही. अखेर, भारतात काही उपाय हाती लागतो का, याचा शोध घेण्यासाठी तो भारतात आलेला आहे. या अत्यंत जटील विकाराने तो संत्रस्त झाला आहे. झोप नसल्याने त्याच्या शरिरावर विपरीत परिणाम झाला आहे. तो मार्गांवरुन नीट चालूही शकत नाही. कोणतेही काम त्याला धडपणे करता येत नाही. झोपेच्या गोळ्या किंवा शस्त्रक्रिया करताना उपयोगात आणल्या जाणाऱ्या बेशुद्ध करणाऱ्या इन्जेक्शनचाही त्याच्यावर काही परिणाम होत नाही. अखेर, झोपेच्या शोथार्थ त्याने विविध देशांचा प्रवास करुन त्या देशांमधील परंपरिक औषध पद्धती त्याने उपयोगात आणल्या आहेत. आता तो निद्रा प्राप्त करण्यासाठी भारतात आला आहे. भारतात आयुर्वेद व योगासाधना अशा पारंपरिक वैद्यकीय पद्धती आहेत. योगसाधना, प्राणायाम व आयुर्वेद यांच्या माध्यमातून आपली गमावलेली निद्रा परत मिळविण्याचा प्रयत्न तो करत आहे.









