जयपूर / वृत्तसंस्था
ऐतिहासिक शहरे, गावे आणि स्थानांची मुस्लीम आक्रमकांनी ठेवलेली इस्लामी नावे बदलून मूळची नावे त्यांना पुन्हा देण्याच्या उत्तर प्रदेशात चाललेल्या उपक्रमाचे अनुकरण आता राजस्थानातील काँगेस सरकारनेही सुरु केले आहे. या राज्यातील मिया का बाडा या रेल्वे स्थानकाचे नाव आता महेशनगर का हॉल्ट असे ठेवण्यात आले आहे. हे रेल्वेस्थानक राजस्थानच्या बारमेर जिल्हय़ात आहे.
हे रेल्वे स्थानक ज्या मिया का बाडा या खेडय़ात आहे, त्या खेडय़ाचे नावही बदलण्यात आले असून ते महेश नगर असे काही दिवसांपूर्वी ठेवण्यात आले होते. तथापि रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आले नव्हते. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्याही संमतीने आता हे नवे नामकरण झाले आहे.
नावे बदललेली काही महत्वाची रेल्वे स्थानके-
1. भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव 2021 मध्ये राणी कमलापती रेल्वे स्थानक असे करण्यात आले. या स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून आता ते जागतिक दर्जाचे झाले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले.
2. उत्तर प्रदेशातील रॉर्बट्सगंज रेल्वे स्थानकाचे नाव सोनभद्र रेल्वे स्थानक असे 2018 मध्ये करण्यात आले. या नव्या नावाला रेल्वे मंत्रालयाने संमती दिली आहे. जुने नाव ब्रिटीश कालीन होते. ते आता भारतीय पद्धतीचे करण्यात आले आहे.
3. वाराणसी येथील मनदुआदिह रेल्वे स्थानकाचे नाव त्याच्या नूतनीकरणानंतर बनारस रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. हे रेल्वे स्थानकही आता अत्याधुनिक सोयींनी युक्त असे करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
4. 2018 मध्ये उत्तर प्रदेशमधील फैझाबाद जिल्हय़ाला त्याचे मूळचे अयोध्या हे नाव पुन्हा देण्यात आले. त्यानंतर 3 वर्षांनी तेथील रेल्वे स्थानकाचे नावही अयोध्या रेल्वे स्थानक असे करण्यात आले. याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे.
5. 5 जून 2018 या दिवशी उत्तर प्रदेशातील मुघलसराई रेल्वे स्थानकाला जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. याच रेल्वे स्थानकावर 1968 मध्ये उपाध्याय यांचा संशयास्पद रितीने मृत्यू झाला होता.
6. उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील झांसी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते राणी लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीशी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.









