पुणे / वार्ताहर :
पुणे शहरात गुन्हेगारी कृत्यांसाठी कोयत्याचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. टिंबर मार्केटमध्ये एका टोळक्याने भांडणाचा बदला घेण्यासाठी तीन जणांवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी दहा जणांच्या टोळक्यावर खडक पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण आगलावे (22), राहुल शेंडगे (22), रोहन शेंडगे (21), अभिषेक ससाने (33), महेश आगलावे (20), स्वस्तिक खवले (22), रोहित थोरात (24), लक्ष्मण जाधव (23), शंकर कोंगाडी (24), रोहित आगलावे (24) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील करण आगलावे, राहुल शेंडगे, महेश आगलावे, लक्ष्मण जाधव या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत सुलतान चांद शेख (27, रा. लोहियानगर, पुणे) यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सहा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुलतान शेख हे त्यांच्या मित्रांसोबत टिंबर मार्केट येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी संबंधित आरोपी हे चार दुचाकींवरुन त्याठिकाणी आले. आरोपी करण आगलावे यांने त्याचा भाऊ रोहित आगलावे याला का मारले, अशी विचारणा करत हातातील कोयत्याने सुलतान शेख याच्या डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर महेश आगलावे या आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने तक्रारदार यांच्या छातीवर वार केला. तर रोहन शेंडगे यानी देखील त्याच्याकडील कोयता मारून शेख यास जखमी केले. राहुल शेंडगे यानी तक्रारदार यांचा मित्र अली शेख याच्यावर यावेळी कोयतेने वार करून त्यास जखमी केले. तर, त्यांचा दुसरा मित्र अकबर यास देखील आरोपींनी कोयत्याने मारून त्यास जखमी करून शिवीगाळ केली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.विटे याबाबत पुढील तपास करत आहेत.









