विमान प्राधीकरण करणार सर्वेक्षण : आमदार अनिल बाबर यांची माहिती
विटा प्रतिनिधी
सांगली शहरानजीक कवलापूर येथील १६० एकर जागेवर विमानतळ उभारणीस आज तत्वतः मान्यता देण्यात आली. मुंबईत उद्योग मंत्रालयात आयोजित बैठकीत उद्योगमंत्री उदय सामांत यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला. औद्योगिक विकास महामंडळाकडे असलेली ही जागा विमानतळ विकास प्राधीकरणाकडे हस्तांतर केली जाईल. प्राधीकरणाने कार्गो विमानतळासाठी सर्वेक्षण करावे, अतिरिक्त किती जमिन लागेल याबाबत अहवाल सादर करावा आणि त्यासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेतून मंजूर करू, अशी ग्वाही श्री. सामंत यांनी दिली.
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पुढाकारने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. खासदार संजय पाटील या बैठकीस हजर होते. आमदार सुधीर गाडगीळ आणि जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी ऑनलाईन पद्धतीने चर्चेत सहभागी झाले. औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शर्मा, उपसचिव शिवाजी पाटील, वरिष्ठ अधिकारी किरण जाधव, वसुंधरा बिरजे, सुभाष तुपा, विमान सेवा प्राधीकरणाचे आर. ए. नाईक उपस्थित होते.
आमदार अनिल बाबर यांनी कवलापूर विमानतळ हे जुने आहे, येथे पुनरुज्जीवन करायचे आहे. आम्ही प्रवासी वाहतूकीपेक्षा जास्त कार्गो विमानतळासाठी आग्रही आहोत, अशी स्पष्ट भूमिका मांडली. सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळींब, भाजीपाला पीकांमध्ये सर्वाधिक वैविध्य आहे आणि या पिकांना जगभर बाजार आहे. कवलापूर विमानतळावरून आखाती देशांसह जगभर निर्यात शक्य आहे. हा जिल्ह्याच्या नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीला बुस्टर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. उदय सामंत यांनी त्याला दुजोरा देताना देवगड, रत्नागिरीचा हापूस आंबादेखील याच विमानतळावरून जगभर पाठवणे शक्य होईल, असा आशावाद व्यक्त केला.
खासदार संजय पाटील यांनी या भूमिकेला पाठींबा जाहीर केला. कवलापूर येथील जागा खासगी कंपनीला विकली जावू नये, यासाठी आपण पाठपुरावा केला होता. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी येथे विमानतळच झाले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, असे त्यांनी बैठकीत जाहीर केले. आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळेल, अशी ग्वाही दिली.
शेतमाल निर्यातीला चालना मिळेल – बाबर
‘‘कवलापूर विमानतळ हे कोल्हापूर विमानतळापेक्षा जुने आहे. आम्ही कवलापूरला कार्गो विमानतळ मागतोय. जिल्ह्यात फळपीक, भाजीपाला शेती मोठी आहे. त्याच्या निर्यातीने जगाचा बाजार जवळ येईल. राहिला विषय प्रवाशांचा, माझ्या खानापूर मतदार संघातील शेकडो गलई व्यावसायिक भारतभर आहेत. दक्षिण महाराष्ट्रात सर्वाधिक विमान प्रवास सांगली जिल्ह्यातील लोक करतात. त्यामुळे कवलापूर विमानतळ उपयुक्त आणि प्रभावी ठरेल.’’
‘‘कवलापूर विमानतळाची सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत गरज आहे. सांगलीच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषी पूरक उद्योगांच्या विकासासाठी कवलापूर येथे विमानतळ व्हावे.’’- आमदार सुधीर गाडगीळ