आश्रयस्थाने नष्ट झाल्याने आसरा शोधण्याची वेळ
सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्हा परिषदेच्या एका कक्षामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना इजाटाचे पिल्लू आढळून आले आहे. सफाई निरीक्षक नितीन पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्या पिलाला अलगद पकडून वन्य जीव मित्र अशोक लकडे यांच्या ताब्यात दिले आहे. उपचार आणि भोजनाची व्यवस्था करून नंतर हे पिल्लू वन विभागाच्या ताब्यात सुरक्षित ठिकाणी पाठवण्यासाठी सोपवले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या एका कक्षामध्ये साफसफाई सुरू असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या नजरेस इजाटाचे पिल्लू आले. सफाई कर्मचाऱ्यांना पाहून घाबरून त्याची धावपळ सुरू झाली. त्यामुळे कर्मचारी पाटील यांनी पूर्वानुभवाने हे पिल्लू हळूवारपणे पकडले.
दरम्यान, वन्यजीव मित्र अशोक लकडे यांनी त्याचा ताबा घेतला असून त्याच्या आहाराची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस असणारा परिसर, काळ्या खणीच्या ठिकाणी असणारा खड्डा आणि जवळपासची नारळाची झाडे यामुळे पूर्वी इथे मोठ्या प्रमाणावर इजाट आढळायचे. मात्र महापालिकेने तिथे बांधकाम काढल्यापासून या प्राण्यांचे राहायचे ठिकाण हरपले आहे. अशावेळी एकतर नारळाच्या झाडावर किंवा अडगळीच्या ठिकाणी ते आसरा शोधतात. त्यांच्यापासून मानवाला कोणताही धोका नाही. त्यामुळे त्याला घाबरून न जाता एखाद्या मांजराला जसे आपण हाताळतो तशाच पद्धतीने हाताळले तर ते बिथरत नाही. त्यामुळे या इजाटाला घाबरण्याचे कारण नाही. खरकटे अन्न खाऊन ते जगते. मात्र घाबरलेले लोक दगड मारतात. असे करू नये, असे आवाहन अशोक लाकडे यांनी केले आहे.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुरक्षितपणे त्या प्राण्याची सुटका केली असली तरी कुटुंबापासून वेगळे झाल्याने या पिलाला आधाराची आवश्यकता आहे. वनविभागाच्या ताब्यात त्याला दिले जाईल. तिथून इजाटांची गर्दी जिथे असेल तिथे ते या पिलाला सोडतील असेही लकडे यांनी सांगितले.









