देवीची पेठ मंदिरात दाखल. कौलोत्सवानंतर दररोज मुखवटे नाचविले जातात. अखेरच्या दिवशी लोकांची मोठी उपस्थिती.

रविराज च्यारी. डिचोली
चैत्र शुध्द पंचमीला मुळगाव डिचोली येथील देवी केळबाईच्या मंदिरातून मयेला जाणासाठी बाहेर पडलेली देवीची पेठ काल सोम. दि. 3 एप्रिल रोजी दुपारी पुर्ववत मंदिरात दाखल झाली. यापूर्वी या पेठेतील ब्रह्मा, विष्णू, महेश व नंदीचे मुखवटे मंदिराच्या सभामंडपात व बाहेर नाचविण्याची प्रथा उत्साहात पार पडली. अखेरच्या दिवशी हि प्रथा पाहण्यासाठी व पेठेचे मंदिरातील आगमन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. चैत्र शुद्ध पंचमीच्या रात्री मुळगावातील देवी केळबाईची पेठ मयेला तीन दिवसांच्या पाहुणचारासाठी जाते. त्यानंतर ती तीन दिवसांनी पुर्ववत मुळगावात दाखल होते. मुळगावातील असंख्य धोंडगण, पेठेचा मोडपुरूष, चौगुले मानकरी व ग्रामस्थ मयेत आपल्या देवीला आणण्यासाठी जातात. मयेतून आपल्या देवीची पेठ पुर्ववत मुळगावात आणल्यानंतर ती पहाटे दाडदेवाच्या ठिकाणी ठेवण्यात येते. त्यादिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुळगावात कौलोत्सव साजरा केला जातो. देवीच्या पेठेकडून मुळगावातील मानक्रयांना, ग्रामस्थांना व उपस्थित भाविकांना कौल दिल्यानंतर पेठ मंदिराच्या उजव्या बाजूला एका विशेष जागेवर ठेवली जाते.
त्या रात्रीपासून सलग पाच दिवस मुळगावात नाटकांचे प्रयोग सादर केले जातात. तसेच कौलोत्सवाच्या दुस्रया दिवशीपासून पाचव्या दिवसापर्यंत दररोज सकाळी पेठेतील ब्रह्मा, विष्णू, महेश व नंदीच्या मुखवट्यांना मंदिराच्या मंडपात व मंडपाबाहेर नाचविले जाते. हि प्रथा पूर्वापारपासून चालत आली आहे. पेठेचे गावात आगमन होऊन ती मंदिराबाहेर विशेष जाग्यावर विराजमान केल्यानंतर या देवतांचा उत्साह मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने ग्रामस्थ साजरा करतात. पेठेतील हे ब्रह्मा, विष्णू व महेश या देवतांचे मुखवटे म्हणजेच ब्रह्मशक्ती, विष्णूशक्ती व शिवशक्ती असून ते देवीचे प्रतिक मानले जाते. देवीच्या मयेतील पाहुणचारानंतर या शक्तींचा उत्साह साजरा.करण्यात येतो, असे गावातील एक जेष्ठ नागरिक प्रकाश गाड यांनी सांगितले. गाड कुटुंबातील देवाचे मानकरी हे मुखवटे नाचवतात. ब्रह्मा व विष्णू यांचे मुखवटे मंदिराच्या सभागृहात, महेशचा मुखवटा सभामंडपाच्या बाहेर उजव्या बाजूला नाचविला जातो. त्याच्या हातात त्यावेळी तलवार दिली जाते. तर नंदीचा मुखवटा सभामंडपाच्या समोर दिपस्तंभाजवळ नाचविला जातो. नाचल्यानंतर लगेच प्रत्येक मुखवटा कपडा घालून झाकला जातो. व तो नंतर नेऊन पेठेत ठेवला जातो. चार दिवस दररोज हा देवतांच्या उत्साहाचा सोहळा सुरू असतो. या मुखवटे नाचविण्याच्या सोहळ्याच्या अंतिम दिनी म्हणजे पाचव्या दिवशी मुखवटे नाचविल्यानंतर दुपारी देवाला प्रसाद दाखविला जातो. मंदिराबाहेर असलेल्या पेठमध्ये सर्व चारही मुखवटे ठेवून ती बांधली जाते. व विधीवतपणे पेठ देवीच्या मंदिरात प्रवेश करते व या संपूर्ण उत्सवाची व उत्साहाची सांगता होते. काल सोम. दि. 3 एप्रिल रोजी या सोहळ्याचा अखेरचा दिवस होता. दुपारी मुखवटे नाचविण्यात आले, देवीला प्रसाद दाखविण्यात आल्यानंतर पेठ मंदिरात प्रवेश करती झाली व या मुळगावातील उत्सवाची सांगता झाली.









