लोणावळा / वार्ताहर :
जुलै महिन्यात मुसळधार कोसळल्यानंतर 30 जुलैपासून पावसाने लोणावळा व मावळ परिसरात विसावा घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या लोणावळा परिसरामधील धबधबे कोरडे पडले असून, डोंगर भागातून वाहणारे पाणी बंद झाले आहे. भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून देखील अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी वाहत असल्याने पर्यटकांचा हिरमोड होऊ लागला आहे.
पुढील आठवडय़ामध्ये सलग सुट्ट्या असल्याने लोणावळा परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने व डोंगर भागातून वाहणारे धबधबे बंद झाल्याने पर्यटक इतर ठिकाणी जाण्याची शक्मयता बळावली आहे. लोणावळा भागात सध्या अतिशय तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून, मावळात हे प्रमाण नगण्य आहे. पावसाचा जोर ओसरल्याने मावळातील सर्व धरणांमधील पाणीसाठा ‘जैसे थे’ राहिला आहे. लोणावळा धरणामधून डक्ट लाईनच्या माध्यमातून वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात असल्याने धरणातील पाणी कमी होऊन लोणावळा शहरातील पुराचा धोका तुर्तास तरी टळला आहे. पवना धरण देखील 94 टक्के भरल्यानंतर धरणातून वीज निर्मितीसाठी पाणी सोडले होते, तर आंद्रा धरणातून देखील पाणी सोडण्यात आले होते. आता मात्र पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधील पाणीसाठा नियंत्रणात असल्याने व नदीनाल्यांमधील पाणी देखील पात्रात नियंत्रण कक्षात असल्याने तालुक्यातील सर्व भागातील पूर ओसरला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. लोणावळा शहरात मागील 24 तासात 3 मिमी पाऊस झाला आहे, तर यावषी आजपर्यंत 3357 मिमी (132.17 इंच) पाऊस झाला आहे.








