वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद जसे कोकणात उमटले तसेच काहीसे आताही राष्ट्रवादीमध्ये उमटले आहेत. खासदार सुनील तटकरेंसह आमदार शेखर निकम, आदिती तटकरे यादेखील अजित पवार यांच्या ए राष्ट्रवादीमध्ये सहभागी झाले आहेत. वर्षभरानंतर पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. जुनी मंडळी शरद पवार यांच्याबरोबर, तर काही जुन्यांसह नवी मंडळी अजित पवार यांच्याकडे वळली आहे. यामध्ये उमेदवारीच्या आशेने शिंदे यांच्याबरोबर गेलेल्यांची कोंडी झाली असली तरी विद्यमान आमदारांना मात्र महायुती म्हणून बळ मिळाले आहे. यामध्ये उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पाय मात्र अधिक खोलात गेला आहे.
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर पंधरा विधानसभेचे एकूण मतदारसंघ येतात. यामध्ये शिवसेनेचे तब्बल नऊ आमदार निवडून गेले होते. आता त्यातील सहा आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. त्यातील दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोघेही राज्याच्या मंत्रिमंडळात
कॅबिनेट मंत्री, तर भरत गोगावले हे विधानसभेत पक्षाचे प्रतोद आहेत. रायगड लोकसभा मतदार संघातील महाडमधून आमदार गोगावले यांच्यासह आ†लबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खेड-दापोली मतदार संघाचे योगेश कदम, त्यानंतर सिंधुदुर्गातून केसरकर, रत्नागिरीतून सामंत यांनी शिंदे यांना साथसंगत केल्याने शिवसेनेच्या वर्षानुवर्षे अभेद्य असलेल्या या गडाला कोकणात आधीच मोठे भगदाड पडले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय उलथापालथ
राज्यातील सत्तानाट्याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार उमटणार आहेत. जिल्ह्यात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा असला तरी नेतृत्व म्हणावं तर खासदार सुनील तटकरे आणि आमदार शेखर निकम हेच आहेत आणि हे दोघेही अजित पवार यांच्याबरोबर शिवसेना, भाजप महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत असले तरी नेतृत्वासाठी या दोघांशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही. जिल्ह्यात एकूण पाच मतदारसंघात आमदार निकम हे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यानंतर चारही आमदार हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत. चारमध्ये योगेश कदम आणि उदय सामंत हे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीच्या सहभागाने खेड-दापोलीत आमदार योगेश कदम यांना राष्ट्रवादीची कुमक दिमतीला मिळणार आहे. त्यांना थोडाफार याचा फायदा होणार असताना तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत परतलेल्या माजी आमदार संजय कदम यांना मात्र या घडामोडींचा काहीसा धक्का आहे. गुहागरमध्ये शिवसेनेच्या भास्कर जाधवांसमोर सध्यातरी सक्षम पर्याय नसला तरी येथील परिस्थिती वेगळी आहे. तेथे राष्ट्रवादीच काय कुठल्याही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने जरी सांगितले तरीही तेथील कार्यकर्ता जाधव यांना मदत करील याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जाधवांना येथे विधानसभेला पेपर काहीसा कठीणच आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीच्या निकमांचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. माजी आमदार रमेश कदमांसह काही जुनी मंडळी निकमांची साथ सोडतील अशी शक्यता आहे. मात्र शिंदे गटात गेलेल्या आणि विधानसभेसाठी तयारी करत असलेल्या माजी आमदार सदानंद चव्हाण यांची मात्र यामध्ये चांगलीच कोंडी झाली आहे. रत्नागिरीत उदय सामंत यांच्यासमोर कुठल्याच राजकीय पक्षाकडे सक्षम पर्यायच नाही, तर राजापूरमध्ये आमदार राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी अजित यशवंतराव यांना मतदारसंघात सक्रिय होण्याच्या सूचना केल्या होत्या. येथे राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशी ताकद ही यशवंतराव यांना मिळणारी आहे.
सिंधुदुर्गमध्ये महायुतीला थोडेसे बळ
राज्यातील राजकीय घडामोडींचा तितकासा परिणाम सिंधुदुर्गच्या राजकारणावर होताना दिसत नाही. मुळातच सिंधुदुर्गात राष्ट्रवादीची ताकद ही मर्यादित आहे. बहुतांशी मंडळी ही राष्ट्रवादी (पवार एस)ला मानणारी आहे, तर राष्ट्रवादी (पवार ए) यांना मानणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. येथे विधानसभेचे एकूण तीन मतदार संघ आहेत. येथे आमदार केसरकर हे शिंदे यांच्याबरोबर गेलेले आहेत. ते मुळचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे किंचितही का होईना जो काही फायदा होईल तो महायुतीला होणार आहे.
रायगडमध्ये शिंदे गटाची कोंडी
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कन्या आमदार आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद असताना निधी वाटपात झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवूनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करीत गोगावले, दळवी, थोरवे हे तीनही आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेले. आज चक्र उलटं फिरलं असून गोगावले यांना वर्षभरात मंत्रीपद मिळाले तर नाहीच; उलट त्यांच्याच नाकावर टिच्चून आदिती तटकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता रायगडच्या त्या एकमेव मंत्री असल्याने पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच जाईल अशी शक्यता आहे. तसे झाले तर मग हे तीनही आमदार नेमके काय करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
मात्र दुसरीकडे तटकरेंचा राष्ट्रवादी पक्ष शिवसेना, भाजप महायुतीत सहभागी झाल्याने या तीनही आमदारांच्या आमदारकीला मात्र काहीसे बळ आले आहे. बंड केल्याने त्यांच्याबरोबरचे सर्वच सहकारी त्यांच्याबरोबर गेलेले नसले तरी तटकरेंची ताकद आता त्यांच्या दिमतीला मिळणार आहे. यामध्ये उबाठा शिवसेनेची तर आणखी पिछेहाट झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून लढताना किमान राष्ट्रवादीच्या ताकदीवर तरी नशीब आजमावता येईल या आशेवर असलेल्यांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये सर्वाधिक गोची ही महाडचे कांग्रेसचे माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांची कन्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांची झाली आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाडमध्ये उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवगर्जना सभेत जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. गोगावले यांना तटकरे यांच्या मदतीने विधानसभेला टक्कर देण्याच्या तयारीत असतानाच तटकरेच महायुतीत गेल्याने जगताप यांची वाट बिकट बनली आहे. आता जगताप यांना स्वगृही परतण्यासाठी कांग्रेस पुन्हा खटपटीला लागला आहे.
राजेंद्र शिंदे








